

नाशिक : नाशिक जिल्हयाचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसतानाच राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पालकमंत्रीपदाबाबत मोठे भाष्य केले आहे. मी नाशिक जिल्हयाचा पालकमंत्री व्हावे, असा लोकांचा आग्रह आहे. पण मला नाशिकचे पालकमंत्री पद नको. कारण पुणे, नाशिक हे जिल्हे विकासात नागपूरच्याही खूप पुढे आहेत. विकासात नाशिक एक नंबरला आहे. जिल्हा आर्थिक सक्षम आहे. त्यामुळे मला एक किंवा दोन छोटे-छोटे आदिवासी जिल्हे द्या, अशी मागणी मंत्री झिरवाळ यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य केले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळ विस्तार तसेच खातेवाटपही झाले. मात्र, पालकमंत्रीपदांबाबत अद्याप तिढा सुटलेला नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजप व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते व मंत्री झिरवाळ यांनी पालकमंत्रीपदाबाबत भूमिका मांडली. मला गोंदिया जिल्ह्याला घेऊन जायचे आहे, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. आता गडचिरोली जिल्ह्यासाठी भरपूर लोकांची मागणी आहे. मात्र मी या दोन-चार जिल्ह्यापैकी एका जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची मागणी केली असल्याचे मंत्री झिरवाळ म्हणाले. पालघर द्या, ठाणे द्या, नंदुरबार द्या, कोणताही जिल्हा द्या, पण आदिवासींचा जिल्हा द्या. मी आदिवासी आहे म्हणून नव्हे, पण मी समाजाचे काहीतरी देणे लागतो. यानिमित्ताने उतराई होण्याची संधी मिळेल, असेही ते म्हणाले.
आदिवासी विकासमंत्री हा आदिवासी समाजाचाच व्हायला हवा, असे राज्यातील जनतेचे मत होते. पण मी कुठलेही मंत्रीपद सांभाळू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार यांनी माझ्याकडे अन्न औषध प्रशासन खाते दिले. ते मी महत्त्वाचे खाते म्हणून पाहतो. या खात्यात मनुष्यबळ कमी आहे. अनेक आव्हाने आहेत. मी २८८ सदस्यांचे सभागृह चालवले. त्यामुळे राज्यही चालवू शकतो, असे झिरवाळ यांनी मिश्किलपणे सांगितले.