

पुढारी विशेष, विकास गामणे, प्रतिनिधी
दवाखान्यातील कागदपत्रांची जुनी कटकट, हरवणारे रिपोर्ट आणि फाइलांचा त्रास... या सर्व त्रासातून आता नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची कायमची सुटका झाली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार, गतिमान आणि पारदर्शक आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'ई-सुश्रुत' प्रणालीच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्ह्याने बाजी मारली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला कायापालट करीत १६० रुग्णालयांना डिजिटल नेटवर्कखाली आणण्यात यश आले आहे.
ही मोहीम कळवण तालुक्यातील नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राने अव्वल कामगिरी करीत महाराष्ट्रातील पहिले 'कागदमुक्त' (पेपरलेस) आरोग्य केंद्र होण्याचा बहुमान मिळवला आहे. या प्रणालीमुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार रुग्णांची संपूर्ण वैद्यकीय माहिती आता 'आभा' आयडीशी सुरक्षितपणे लिंक झालेली असून, रुग्णांना घरच्याघरी स्वतःचा हेल्थ डेटा उपलब्ध होत आहे.
'ई-सुश्रुत' प्रणालीमुळे रुग्णांना आता जुने केसपेपर, औषधांच्या पावत्या किंवा लॅब रिपोर्ट सांभाळून ठेवण्याच्या त्रासातून पूर्ण मुक्ती मिळाली आहे. रुग्णालयात प्रवेश करताच क्यूआर कोड स्कॅन करून टोकन नंबर आणि डिजिटल केसपेपर तयार होतो. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दिलेले औषधोपचार, प्रिस्क्रीप्शन आणि लॅब अहवाल ही सर्व वैद्यकीय माहिती 'आभा' अॅपवर एका क्लिकवर उपलब्ध होते. यामुळे डॉक्टर आणि रुग्ण दोघांचाही मोलाचा वेळ वाचत आहे.
नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १ टक्केदेखील कागदाचा वापर न करता, सर्व कामकाज १०० टक्के ऑनलाइन पद्धतीने चालवले जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बैरागी यांच्या अथक प्रयत्नातून हे केंद्र राज्यातील पहिले पेपरलेस आरोग्य केंद्र बनले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अशी एकूण १६० शासकीय रुग्णालये या यंत्रणेशी जोडली गेली आहेत.
हा डिजिटल टप्पा गाठण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिपी व अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रणालीच्या तांत्रिक अंमलबजावणीसाठी इंजिनियर लीना काळे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक झाली आहे.
1. रुग्णांसाठी फायदा:
रुग्णांना केसपेपर, जुन्या औषधांच्या चिट्ठ्या किंवा लॅब रिपोर्टच्या फाइल्स सांभाळून ठेवण्याची गरज उरत नाही.
क्यूआर कोड स्कॅन करून तत्काळ टोकन मिळते, त्यामुळे केसपेपरच्या रांगेत रुग्णांना तासन् - तास उभे राहावे लागत नाही.
सर्व वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांचा सल्ला आणि औषधांची माहिती रुग्णाला 'आभा' अॅपवर कधीही आणि कुठेही पाहता येते.
रुग्णाचा डिजिटल डेटा आधीच सिस्टीममध्ये उपलब्ध असल्यामुळे डॉक्टरांना जुनी माहिती समजून घेणे सोपे जाते, तपासणी वेगाने होते.
2. डॉक्टर, रुग्णालयासाठी फायदा:
रुग्णाला पूर्वी काय आजार होता, कौनती औषधे दिली होती किंवा कोणत्या एलर्जी आहे, याची संपूर्ण माहिती डॉक्टरांना स्क्रीनवर एका क्लिकवर दिसते.
कागदाचा वापर १०० टक्के बंद किंवा अत्यंत कमी झाल्यामुळे रुग्णालयाचा कागदपत्रावरील खर्च वाचतो आणि पर्यावरणाचे रक्षण होते.
रुग्णालयात कोणता औषधसाठा उपलब्ध आहे आणि कोणता संपला आहे, याची माहिती ऑनलाइन मिळते.
नोंदी, लॅब, फार्मसी आणि वार्ड या सर्व विभागांचे कामकाज एकाकांशी जोडले गेल्याने रुग्णालयाचे प्रशासन अधिक पारदर्शक व सक्षम होते.
ई-सुश्रुत ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाद्वारे शासकीय रुग्णालयांमध्ये लागू करण्यात आलेली वेब-आधारित हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. रुग्णालयातील केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टर तपासणी, औषधवाटप, लॅब चाचण्या आणि डिस्चार्जपर्यंतचे सर्व कामकाज कागदाऐवजी डिजिटल (ऑनलाइन) पद्धतीने करणारी ही आधुनिक संगणकीय प्रणाली आहे. ही प्रणाली रुग्णांचा सर्व वैद्यकीय इतिहास आणि आरोग्य नोंदी 'आभा' आयडीशी जोडते.