

निफाड (नाशिक), किशोर सोमवंशी
पक्ष्यांचे नंदनवन असलेले नांदूरमधमेश्वर पुन्हा एकदा पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजले आहे. थंडीची चाहूल लागताच देश-विदेशातून सुमारे २० हजार स्थलांतरित पक्ष्यांनी या जलाशयाचे नंदनवन गाठले असून, संपूर्ण परिसर रंगीबेरंगी पंखांनी खुलून गेला आहे. नाशिक जिल्ह्याचे "भरारी घेतलेले सौंदर्य" म्हणून ओळखले जाणारे हे अभयारण्य सध्या निसर्गप्रेमी, पर्यटक आणि छायाचित्रकारांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.
दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात नांदूरमधमेश्वर जलाशयात थंड प्रदेशातून हजारो पक्ष्यांचा विसावा लागतो. सायबेरियन, पिंटेल, ग्रे हेरॉन, ब्राह्मणी डक, कॉर्मोरंट, ब्लॅक हेडेड आयबिस, लॅपविंग, स्टिल्ट, ब्लॅक-टेल्ड गॉडविट, फ्लेमिंगो, लिट्ल इग्रेट, व्हिसलिंग टील अशा विविध दुर्मिळ प्रजाती येथे सध्या दिसत आहेत. या पाहुण्यांमुळे अभयारण्य गजबजून गेले आहे.
नांदूरमधमेश्वर अभयारण्य हे "भारताचे मिनी भरतपूर" म्हणून ओळखले जाते. येथील समृद्ध जैवविविधता, जलाशयाचा विस्तार आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे जागतिक पातळीवरही या ठिकाणाला ओळख मिळाली आहे. युनेस्कोने २०१९ साली या क्षेत्राचा "रामसर जलक्षेत्र" म्हणून समावेश केला होता, ज्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. सध्या निसर्गप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण उत्साहवर्धक ठरले आहे. सूर्योदयाच्या किरणांतून चमकणारे जलाशय, पाण्यावर उडणारे पक्ष्यांचे थवे आणि त्यांच्या मंजुळ किलबिलाटाने नांदूरमधमेश्वर परिसर खऱ्या अर्थाने “पक्ष्यांचे नंदनवन” बनला आहे.
यंदा आगमन लवकर
नांदूरमधमेश्वर जलाशय, त्याच्या सभोवतालचा पाणथळ प्रदेश आणि गवताळ परिसर पक्ष्यांसाठी आदर्श निवासस्थान आहे. येथे उपलब्ध असलेल्या जलवनस्पती, मासे, कीटक आणि शांत वातावरण यामुळे स्थलांतरित पक्ष्यांना सुरक्षितता आणि खाद्य दोन्ही सहज मिळते. त्यामुळे दरवर्षी त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, यंदा थंडी लवकर पडल्याने स्थलांतरित पक्ष्यांचे आगमनही लवकर झाले आहे. अभयारण्यात सध्या अंदाजे २० ते २२ हजार पक्ष्यांची नोंद झाली असून, आगामी आठवड्यांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहे.