

नांदगाव (नाशिक) : शहरातील रेल्वे गेट बंद करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या भुयारी मार्गात सातत्याने पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक वाढते. पाणी उपसण्याचे काम नियमितपणे केले जात असले तरी, काही प्रमाणात पाणी कायम राहतेच. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागते. रेल्वेगेट बंद झाल्यानंतर नांदगाव शहराचे दोन भाग पडतात. शहराच्या आतील भागात शाळा, महाविद्यालये, बँका आणि पोलिस स्टेशन असून, बाहेरील भागात तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि अन्य शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या भुयारी मार्गावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. जोरदार पावसात हा मार्ग अक्षरशः तळ्यात रूपांतरित होतो आणि शहराला जोडणारा पर्यायी बाह्यवळण मार्ग काही किलोमीटर लांब असल्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाची समस्या अधिकच तीव्र होते. याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांनाही बसत आहे. भुयारी मार्गाची रुंदी कमी असल्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना तासन्तास खोळंबून राहावे लागते.
भुयारी मार्गात पाणी साचल्यास नागरिकांना रेल्वेचे ट्रॅक ओलांडून जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतो. या ठिकाणी पादचारी पुलाची सुविधा नसल्यामुळे अनेक अपघात झाले असून, काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. नागरिकांनी वारंवार पादचारी पुलाची मागणी केली असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नांदगावकरांची ही मागणी कधी पूर्ण होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
या भुयारी मार्गामध्ये बाराही महिने पाणी साचलेले असते. पावसाळ्यात तर अनेक वेळा हा भुयारी मार्ग तुडुंब असतो. यामुळे आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. तरी या भुयारी मार्गाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.
भूषण धूत, नागरिक, नांदगाव