

नांदगांव | परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना निषेधार्थ नांदगांव रिपब्लिकन पक्ष तसेच आंबेडकरी जनतेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन शुक्रवार दि. १३ रोजी करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ नांदगांव बंदच्या दिलेल्या हाकेला व्यापाऱ्यांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, याच घटनेचा निषेध करण्यासाठी नांदगाव येथील आंबेडकरी जनतेकडून बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला नांदगावकरांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले, शहरातील सर्व व्यापारी वर्गाने या बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती.
या वेळी आंबेडकरी अनुयायाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकापासून जनाक्रोश मोर्चाला सुरवात करण्यात येऊन संपूर्ण गावातून हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा हुतात्मा चौक येथे सभा घेऊन नायब तहसीलदार आर आर महाजन यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी नांदगांव पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी संतोष गुप्ता सुनील जाधव, राजाभाऊ पवार. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे , अरुण पाटील, महावीर जाधव, नितीन जाधव, कपिल तेलूरे भाजपचे संजय सानप, मनोज चोपडे राजाभाऊ गुडेकर, रविभाऊ सोनावणे, राजाभाऊ गांगुर्डे, नितीन जाधव, ऍड विद्या कसबे, नाना जाधव, ऍड सचिन साळवे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत परभणी येथील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला. यावेळी भारतीय संविधान प्रेमींनी मोठी उपस्थिती लावली होती.
------------
फोटो
( छाया सचिन बैरागी )