

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालसाणे (ता. चांदवड) येथे होणाऱ्या णमोकार महोत्सवासाठी सर्व प्रशासकीय विभाग हे सुरक्षिततेची सर्वतोपरी दक्षता घेत देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर, रेल्वे आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहेत. त्यासाठी या महोत्सवाच्या ठिकाणी हेलिपॅड, वाहनतळ, मुख्य मंडप, पाणीपुरवठा व स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या महोत्सवाच्या तयारीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे विशेष लक्ष असून, ते वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. णमोकार तीर्थ येथे शुक्रवार (दि. ६) पासून धार्मिक महोत्सवाला प्रारंभ होईल. यानिमित्त जगभरातून जैन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.
येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, येणाऱ्या भाविकांनी जिल्ह्याचे चांगले नावलौकिक घेऊन जावे, यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी प्रसाद प्रयत्नशील आहेत. या धार्मिक महोत्सवासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी लाखोंचा निधी मंजूर केलेला आहे. त्यातून भाविकांसाठी मंडप, वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहनतळ, भाविकांसाठी विशेष बसेसही सोडण्यात येणार आहेत.
तसेच हेलिकॉप्टरने येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र हेलिपॅडही तयार करण्यात आले आहेत. या महोत्सव काळात नाशिकपर्यंत विशेष रेल्वेची सोय करता येत असेल, तर त्यासाठीही प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेचे विविध विभाग, महसूल विभाग, बांधकाम, स्वच्छता आदी विभागांचे अधिकारी या तयारीत गुंतले आहेत. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत वेळोवेळी सोयी सुविधांचा आढावा घेऊन वरिष्ठांना सादर करत आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (दि. ३१) मालसाणे येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली. त्यानंतर आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी उपस्थित होते.