

मालेगाव : नामको बँकेच्या माध्यमातून झालेल्या हवाला आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, देशातील 21 राज्यांतील 201 बँकांच्या खात्यातून एक हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची शक्यता व्यक्त करत, यातील 600 कोटी दुबईला पाठविल्याचा तसेच विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादसाठी 100 कोटी रुपये रोख स्वरूपात वाटप झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
येथील नामको बँकेच्या शाखेतून बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी सोमवारी (दि. 9) मालेगाव गाठत अनेक धक्कादायक आरोप केले. तसेच हा पैसा आतंकवादी संघटनेला पुरविला गेल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ते येत्या 11 डिसेंबरला फसवणूक झालेल्या मालेगाव येथील तरुणांची भेट घेणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. त्यांनी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, नामको बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र येथेदेखील भेट घेत चौकशीची मागणी केली.
दरम्यान, या आर्थिक घोटाळ्याचा मास्टर माइंड मेहमूद भगाड हा फरार आहे. यात एकूण 27 संशयित असून, यातील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात मालेगाव येथील सिराज मोहंमदसह नामको बँक शाखेतील दोघांचा समावेश आहे.
या आर्थिक घोटाळ्यातील पैसे दहशतवादासाठी पुरविल्याचा आरोप करत सोमय्या यांनी याबाबत ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदींकडे यापूर्वीच तक्रार देत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने मालेगावसह मुंबई, सुरत, अहमदाबाद येथे छापेदेखील टाकले आहेत. आता पुन्हा सोमय्या यांनी संपूर्ण प्रकरण व्होट जिहादशी संबंधित असल्याचा आरोप केल्याने येत्या काळात हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही गाजणार असल्याचे दिसत आहे.