

नाशिक : निसर्गसंवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या निसर्गफेरीत वनस्पतिशास्त्र अभ्यासकांनी विद्यार्थ्यांना परिसरातील जैवसाखळी, वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व आणि वाढत्या शहरी विकासामुळे निसर्गावर होणारे परिणाम यांबाबत मार्गदर्शन केले. परिदा फाउंडेशनच्या पुढाकारातून तपोवन परिसरात वनस्पतिशास्त्रीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
दौऱ्यात तपोवन परिसरातील 60 हून अधिक स्थानिक वृक्षप्रजातींची ओळख, सद्य:स्थिती आणि त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेचा अभ्यास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षणातून केला. यावर आधारित संक्षिप्त वैज्ञानिक अहवालही तयार करण्यात आला. नाशिकच्या वारशाचे प्रतीक असलेल्या वड, उंबर, चिंच यांसारख्या जुन्या स्थानिक झाडांची शहराच्या पर्यावरण साखळीतील अनन्यसाधारण भूमिका आणि विशेषतः कुंभमेळा व विकासकामांमुळे होणाऱ्या वृक्षतोडीचे दूरगामी दुष्परिणाम यावरही तज्ज्ञांनी प्रकाश टाकला.
उपक्रमात सहभागींचे मार्गदर्शन त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शरद कांबळे, के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. हेमेंद्र शिंदे, प्रा. डॉ. अविनाश घोळवे, प्रा. स्मरणिका कोरडे, केटीएचएमचे प्रा. डॉ. व्ही. बी. सोनवणे आणि फॉरेन्सिक मेडिसीन तज्ज्ञ डॉ. आनंद पवार यांनी केले. या उपक्रमात सुमारे २० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी केव्हीएन नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांचे सहकार्य मिळाले. उपस्थितांत परिदा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. सौरभ झेंडे, उपाध्यक्ष ॲड. आकाश सातपुते आणि कार्यकारी सदस्य ॲड. मंजुषा पाटील यांचा समावेश होता.