Nahsik News | प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय: आज लेखणीबंद; सोमवारपासून कामबंद इशारा
Collector's Office Nashik
नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करताना महसूल कर्मचारी. (छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनादरम्यान गुरुवारी (दि. ११) जेवणाच्या सुटीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी निदर्शन केली. यावेळी जुनी पेन्शन लागू करण्यासह अन्य मागण्यांच्या प्रतिपूर्तीसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

शासनस्तरावर वर्षानुवर्षांपासून महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन केले जात आहे. सर्वात महत्वपूर्ण मागणी जुनी पेन्शनची आहे. तसेच महसूलचा सुधारित आकृतिबंध लागू करण्यात यावा. राज्यातील महसूल विभागात अव्वल कारकून-मंडळाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती आदेश निर्गमित करावे. महसूलसाठी एक परीक्षा पद्धती लागू करताना महसूल सहायकांचा ग्रेड-पे २४०० रुपये करावा आदी मागण्या आहेत. आंदोलनात महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार नागरे, दिनेश वाघ, कार्याध्यक्ष रमेश मोरे, अमोल हांडगे, महेश सावंत, आदित्य परदेशी, अर्चना देवरे यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

आज लेखणीबंद

मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (दि. १०) आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. त्यातंर्गत दुसऱ्या दिवशी गुरूवारी (दि. ११) निदर्शने केली गेली. आंदोलनात शुक्रवारी (दि. १२) लेखणी बंद, तर सोमवारपासून (दि.१५) कामबंद आंदोलन केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news