

नाशिक : दमदार पावसामुळे शहरातील बहुतांश भागांमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने, रहिवाशांची तारांबळ उडाली होती. सखल भागात तर तळ्याचे स्वरुप आले होते. रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी असल्याने, त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. सातपूर, नाशिकराेड तसेच पंचवटी भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. रविवार (दि.28) रात्री उशिरापर्यंत पाणी काढण्याचे काम सुरू होते.
नाशिकरोड परिसरातील अश्विनी सोसायटी, जेतवन नगर, मनोहर गार्डन, निसर्ग उपचार केंद्र तसेच आर्टिलरी सेंटर परिसर, लोणकर मळा, पाटोळे मळा आणि चव्हाण मळ्यातील अनेक भागांमधील घरात पाणी शिरले होते. काही ठिकाणी घरांच्या भिंतींमधून पाणी आत आल्याने, रहिवाशांचे हाल झाले. सातपूर परिसरातील श्रमिकनगर, अशोकनगर, धर्माजी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तर पंचवटी भागातही घरांमध्ये पाणी शिरल्याचे समोर आले. सिडको परिसरात जागोजागी पाणी साचल्याने, नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, दुपारी ४ वाजता पावसाने काहीशी उसंत घेतल्याने, नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, रात्री पुन्हा मुसळधार पाऊस बरसल्याने, नागरिकांची चांगलीच दमछाक झाली.
राजकारण्यांनी साधली संधी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी मुसळधार पावसातही संधी साधली. ज्या भागात पाणी साचले, त्या भागाचा पाहणी दौरा करीत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या मंडळींनी केल्याचे दिसून आले. काहींनी थेट महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधत, तत्काळ घटनास्थळी येण्यास सांगितले. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले.