

मनमाड (नाशिक) : अजनी (नागपूर)–पुणे दरम्यानची वंदे भारत एक्सप्रेस रविवार (दि. १०) पासून सुरू झाली. सायंकाळी मनमाड स्थानकावर गाडीचे आगमन होताच रेल्वे अधिकारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी आणि नागरिकांनी जोरदार स्वागत केले. स्थानकाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. गाडी प्लॅटफॉर्मवर येताच ढोल-ताशांच्या गजरात फुलांची उधळण करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी पुण्याकडे रवाना झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी तीन वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ झाला, त्यात नागपूर–पुणे गाडीचाही समावेश आहे. ही ८८१ किमी अंतर कापणारी सर्वात लांब वंदे भारत ट्रेन असून महाराष्ट्रातील १२ वी वंदे भारत ट्रेन आहे. ७३ किमी प्रतितास वेगाने धावणारी ही ट्रेन नागपूर व पुणे दरम्यान १० स्थानकांवर थांबेल. या दोन वाढत्या शहरांमध्ये लघु-मध्यम उद्योग, शैक्षणिक व वैद्यकीय संस्था, ऐतिहासिक व पर्यटन स्थळे असल्याने या सेवेने कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. प्रवासी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा फायदा होईल.
गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व डबे वातानुकूलित असून स्वयंचलित तापमान नियंत्रण, आरामदायी आसन व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे, पॅनोरॅमिक खिडक्या, बायो-व्हॅक्यूम शौचालये, अग्निसुरक्षा उपाय, सीसीटीव्ही कॅमेरे व इंटरकॉम प्रणाली आहेत. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत तयार झालेली ही ट्रेन तंत्रज्ञान व स्वावलंबनाचे प्रतीक आहे.
अजनीहून सुटल्यानंतर ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड मार्गे पुण्यात पोहोचेल.
मनमाड येथे स्वागतावेळी रेल्वे अधिकारी योगेश गरड, सुनील गढवाल, एस. पी. पाटील, राजेशकुमार केशरी, व्ही. बी. मिश्रा, सुरेंद्र हिवाळे, विवेक भालेराव, डी. जे. पांडे, राकेश कुमार, केशव जैन, आनंद गांगुर्डे, पी. के. सक्सेना, एफ. जी. सय्यद, हर्षल घाटे, चौहान, संदीपकुमार देसवाल, देवेंद्र विश्वकर्मा यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.