

नगरसूल : नगरसूल रेल्वेस्थानक नांदेड विभागाचे शेवटचे स्थानक असून, या ठिकाणी नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. कांदा रॅकमुळे मोठ्या प्रमाणात उलाढालही होत असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता नगरसूल रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल अर्थात आरपीएफच्या आउटपोस्टचे स्वतंत्र पोस्टमध्ये म्हणजेच पूर्ण स्वरूपाच्या स्वतंत्र पोलिस स्थानकामध्ये श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पोलिस निरीक्षकांसह एकूण 24 अधिकारी व कर्मचारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत. प्रवासीवर्गाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे श्रेणीवर्धन अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
आरपीएफ हे प्रामुख्याने रेल्वेच्या स्थावर मालमत्तेचे संरक्षण, तसेच रेल्वेस्थानक परिसरातील व रेल्वेत प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील पार पाडत असते. या सुरक्षा दलाची येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वेस्थानक आउटपोस्ट (पोलिस चौकी) होती. ही चौकी छत्रपती संभाजीनगर आरपीएफ पोलिस स्थानकांतर्गत येत होती. नगरसूल ते छत्रपती संभाजीनगर अंतर जवळपास 100 किलोमीटर आहे.
या दरम्यान रोटेगाव (वैजापूर), दौलताबाद अशा काही रेल्वे पोलिस आउटपोस्ट येतात. नगरसूल हे टर्मिनल स्थानक असून, आंध्र प्रदेश, तेलंगणातून शिर्डीला येणार्या भाविकांच्या सर्व रेल्वेगाड्या येथे टर्मिनेट होतात. तसेच कांद्याची मोठ्या प्रमाणात जावक होत असल्याने किसान रेलचे मोठ्या प्रमाणात लोडिंग होते. या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्वीच्या आउटपोस्टच्या पायाभूत सुविधा पुरेशा ठरत नव्हत्या. हे लक्षात घेऊन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीनगर पोस्टचे विभाजन करून नगरसूल आउटपोस्टचे पोलिस पोस्टमध्ये म्हणजेच मुख्य पोलिस स्थानकामध्ये श्रेणीवर्धन करण्याची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाकडून नगरसूल स्थानकासाठी स्वतंत्र आरपीएफ पोस्ट मंजूर करण्यात आली आहे.
पूर्वीच्या आउटपोस्टचे प्रमुख हे पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी असायचे. आता या पोलिस स्थानकाचे प्रमुख म्हणून पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासह 1 उपनिरीक्षक, 1 सहायक उपनिरीक्षक, 10 हेड कॉन्स्टेबल, 11 कॉन्स्टेबल असे एकूण 24 अधिकारी व कर्मचार्यांचे मोठे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. आगामी काळात स्वतंत्र चारचाकी वाहनाची तरतूददेखील करण्यात येईल.
सुरक्षाव्यवस्था होणार भक्कम
रेल्वेकडून करण्यात आलेल्या श्रेणीवर्धनामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षाव्यवस्था भक्कम होणार आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन आहट’ या अभियानालादेखील मोठे बळ मिळणार आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनेदेखील ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. कारण दक्षिण भारतातून रेल्वेमार्गे शिर्डी किंवा नाशिकला येण्यासाठी नगरसूल हेच मुख्य स्थानक असणार आहे. दरम्यान, नव्याने स्वतंत्र पोलिस स्थानक निर्माण केल्याने, त्यासाठी भव्य अशी इमारतदेखील बांधली जात आहे.