

नाशिक : एनए मंजुरी प्रक्रियेत होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत एनए परवानगीची प्रक्रिया १ डिसेंबरपासून ऑनलाईन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिली.
एनए परवानगीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असून या संदर्भातील अर्थकारण चर्चेचा विषय ठरला आहे. अर्जदारांना विविध टप्प्यांवर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दस्तऐवज पडताळणी, नकाशा मंजुरी आणि तांत्रिक तपासणीसाठी वेळोवेळी फेऱ्या वाढत असल्याने नागरिकांचा त्रास वाढत असताना बीएमएस प्रणाली तयार करत आता फक्त ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. कुठलेही ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रसाद यांनी सागितले. या प्रक्रियेत होणारे अर्थव्यवहार रोखण्यासाठी तसेच एनए परवानगीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
ऑनलाइन प्रणालीचे फायदे
अर्जदारांना अर्जाची स्थिती घरबसल्या समजणार.
परवानगी प्रक्रियेतील गैरव्यवहारांना आळा बसणार
अर्जातील त्रुटी ऑनलाइन दुरुस्त करता येणार.
नागरिकांचा वेळ वाचणार
महसूल विभागातील चक्कर कमी