

ठळक मुद्दे
जिल्ह्यात सरासरी 76.52 टक्के मतदान; मतदानादरम्यान जोरदार राडा
मनमाडमध्ये भाजप-शिंदे गटाचे समर्थक भिडले
त्र्यंबकमध्ये पोलिस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक : सत्ताधाऱ्यांत प्रतिष्ठेच्या झालेल्या जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी मंगळवारी (दि. २) झालेल्या मतदाना दरम्यान, अनेक ठिकाणी सत्ताधारी घटक पक्षातील कार्यकर्ते, समर्थकांत राडा झाल्याच्या घटना घडल्या. सकाळपासून जिल्ह्यातील मनमाड, येवला, सटाणा आणि त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी कार्यकर्ते आणि प्रतिस्पर्धी गट आमने-सामने आले होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांत वादंग झाल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटना वगळता इतर नगरपरिषदांत शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी सहापर्यंत ११ नगरपरिषदांसाठी सरासरी 76.52 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. दरम्यान, मतदान झाल्याने उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. सर्व नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे.
जिल्ह्यातील सटाणा, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर आणि भगूर या नगरपरिषदांत सत्ताधारी आणि विरोधकांत थेट लढत आहे. मंगळवारी सकाळी आठला मतदानास प्रारंभ झाला. थंडीतही मतदारांनी उत्साह दाखवला. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. दुपारी काही मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. मात्र, चारनंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री उशारापर्यंत मतदान सुरू होते. भगूर येथे मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेल्या मतदान यादीत शिवसेना उमेदवारांचे नाव नसल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, दोन मतदार याद्या असून एकच ठेवण्यात आल्याने अर्धा तास हा गोंधळ झाला. अखेरला दुसऱ्या मतदार यादीत नाव सापडले. त्यानंतर त्यांनी मतदान केले.
नगरपरिषद निहाय मतदान असे झाले
नगरपरिषद - मतदान (टक्के)
पिंपळगाव बसवंत - ७३.२१ टक्के
मनमाड - ५६.१४ टक्के
भगूर - ७४.१३ टक्के
नांदगाव - ६०.१८ टक्के
सिन्नर - ६७.६५ टक्के
सटाणा - ६७.३६ टक्के
येवला - ६२.१८ टक्के
त्र्यंबकेश्वर - ८६ टक्के
इगतपुरी - ६८.२९ टक्के
ओझर - ६०.६२ टक्के
चांदवड - ७४.५२ टक्के
दुपारी साडेतीनपर्यंत ४६.७१ टक्के मतदान
दरम्यान, जिल्ह्यात दुपारी साडेतीनपर्यंत जिल्ह्यात ४६.७१ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान येवला तर सर्वाधिक मतदान त्र्यंबकमध्ये झाले आहे. येवल्यात दुपारी दुपारी साडेतीनपर्यंत ३७.०२ तर त्र्यंबकला ६९.७५ टक्के मतदान झाले. पिंपळगाव बसवंत ५७.०२, भगूर ५२.४३, मनमाड ३९.५२, सिन्नर ४८.०३, इगतपुरी ४८.७३, चांदवड ५३.३९ टक्के मतदान झाले.
मनमाडमध्ये भाजप - शिंदे समर्थक भिडले
मनमाडमध्ये नेहरूभवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. प्रभाग क्र. ११ मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही गट भिडले. ढकलाढकली आणि धक्काबुक्की सुरू झाली. यात भाजपच्या उपाध्यक्षही धक्काबुक्कीस सामोरे गेले. काही काळ मतदारांची पळापळ झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना वेगळे केले. मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
येवल्यात पवार गट आणि शिवसेनेत हाणामारी
येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना समर्थकांत झालेल्या वादातूनही राडा झाला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्राबाहेर सतत तणाव निर्माण होत असल्याने पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते.