

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकांसाठी प्रभागरचना संदर्भात महाविकास आघाडी सरकारने काढलेला तीन सदस्यीय आदेश रद्द केला आहे.
सन २०२२ मध्ये काढलेला चार सदस्यीय प्रभागरचनेचा आदेश कायम ठेवत, त्यानुसार महापालिकांना चार सदस्यीय प्रारुप प्रभागरचना करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेतही आता चार सदस्यीय प्रभागरचना अस्तित्वात येणार आहे. लोकसंख्येत वाढ नसल्याने १२२ सदस्यसंख्या कायम राहणार आहे.
ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेच्या वादामुळे नाशिकसह राज्यातील महापालिकेच्या निवडणुका सहा ते तीन वर्षापासून रखडल्या आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला असून फेरप्रभागरचनेचे आदेश शासनाला दिले आहेत. त्यानुसार नगरविकास विभागाने सन २०२२ मधील प्रभागरचनेबाबत घेतलेला आदेश कायम ठेवत, त्यानुसार महापालिकांना चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत नाशिक महापालिकेत २०१७ च्या निवडणूकीप्रमाणे १२२ सदस्यसंख्येचे चार सदस्यीय २९ व तीन सदस्यीय दोन असे एकूण ३१ प्रभाग आहेत. महाविकास आघाडी सरकारने २०२१ मध्ये लोकंसख्येत अंदाजे १५ टक्के वाढ गृहीत धरून सदस्यसंख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.त्या निर्णयानुसार नाशिकमध्ये १३३ सदस्यसंख्या अस्तित्वात येऊन फेरप्रभागरचनेत ३६ प्रभाग अस्तित्वात येणार होते. मात्र महायुती सरकारने सन २०२२ मध्ये त्यात बदल करत, सन २०१७ नुसार चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेतला होता. नगरविकास विभागाने मंगळवारी (१०) काढलेल्या आदेशात सन २०२२ मधील प्रभागरचनेचा आदेश कायम ठेवल्याने नाशिकमध्ये आता सन २०१७ प्रमाणे चार सदस्यीय प्रभागरचना अस्तित्वात येणार आहे.
नगरविकास विभागाने मंगळवारी काढलेल्या आदेशात जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या लगतच्या जनगणनेनुसार प्रारुप प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेत १२२ नगरसेवकांची संख्या कायम राहणार आहे. आरक्षणाची सोडत मात्र नव्याने काढली जाणार आहे. त्यामुळे राजकीय समिकरणे देखील बदलणार आहेत.
एकूण सदस्यसंख्या - १२२
एकूण प्रभाग - ३१
पक्षनिहाय स्थिती
भाजप - ६६
शिवसेना - ३५
मनसे - ५
काँग्रेस - ६
राष्ट्रवादी काँग्रेस - ६
अपक्ष - ३
आरपीआय (ए) - १
नाशिक, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली.