

सुनील थोरे
चांदवड : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मंगरूळ येथील सोमा टोल वेज कंपनीच्या आपत्कालीन अपघात विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या 151 स्थानिक भूमिपुत्र कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आल्यानंतर नवीन कंपनीकडून जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर न घेण्याचा निर्णय घेतल्याने शेकडो कुटुंबांपुढे उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.
हे कर्मचारी मागील १६ वर्षांपासून रुग्णवाहिका सेवा, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग, अग्निशमन विभाग तसेच क्रेन सेवेत कार्यरत होते. विशेषतः चांदवड रेणुका देवी घाट, राहूड घाट आणि लळीग घाट परिसरात होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये सर्वप्रथम मदतीला धावून जाणारे हेच कर्मचारी होते. घाटातील प्रत्येक वळण, धोकादायक ठिकाणे आणि पर्यायी मार्गांची त्यांना पूर्ण माहिती असल्याने अनेक वेळा त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.
महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे, दरीत उतरून बचावकार्य करणे, आग लागल्यास अग्निशमन यंत्रणेसह मदत करणे, ट्रॅफिक जाम झाल्यास वाहतूक सुरळीत करणे अशा अत्यंत जबाबदारीच्या सेवा हे कर्मचारी सातत्याने बजावत होते. मात्र आता अचानक कामावर येऊ नये, असे सांगण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक युवकांना रोजगार मिळावा आणि अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी खासदार, आमदार, मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.या पार्श्वभूमीवर चांदवड टोल नाका आणि धुळे टोल नाका येथे कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. प्रशासन आणि नवीन कंपनीने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या 14 मेपासून चांदवड व धुळे टोल नाक्यावर साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रश्नामुळे स्थानिक स्तरावरही तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अनेक सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी भूमिपुत्र कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावरील आपत्कालीन सेवांचा अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना डावलल्यास भविष्यात अपघातग्रस्तांच्या मदतकार्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.