

Mumbai-Agra Highway Accident In Nashik
घोटी वार्ताहर :- नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव शिवारात आज मुंबईच्या दिशेने पुढे जाणाऱ्या कारला बल्गर कंटेनर ने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कार पूर्णता चेपली जाऊन व चक्काचूर होऊन झालेल्या या अपघातात कारमधील चार भाविक जागीच ठार झाले. आज गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मुंढेगाव परिसरातील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रम येथे दर्शन सोहळा आटपून मुंबई अंधेरी येथे जात असताना काळाने यांच्यावर झडप घातली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच मुंढेगाव ग्रामस्थ व महामार्गावरील वाहन चालकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार व त्यातील मृतांना बाहेर काढले. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातग्रस्त कारमधील प्रवासी नित्यानंद सावंत (वय 62), विद्या सावंत (वय 65), विना सावंत (वय 68) हे ( तिघेही राहणार चार बंगला परिसर अंधेरी ) तसेच चालक दत्ता राम राहणार मुंबई हे चौघेही जागीच ठार झाले. मृतामधील तिघेही अविवाहित असून नित्यानंद सावंत हे बीएमसी विद्या सावंत बृहन्मुंबई टेलीनिगम (MTNL ) येथील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आज सकाळी ते गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील बाबा रामदास आश्रमात मंदिरात आले होते.
आज दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबईकडे प्रवास सुरू करताच काही मीटर अंतरावर मागून येणाऱ्या ऐश (राख) भरलेल्या टँकर बल्गर ने जोराची धडक दिली आहे. यामध्ये कार क्रमांक MH 02 CV 5230 ही जागीच चक्काचूर झाली तर बल्गर टँकर क्रमांक MH 15 JW 1090 हाही महामार्गावर पलटी होऊन त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा अपघात इतका भीषण होता की इको कार ही दगडी बॅरिकेटमध्ये अडकली होती. पोलीस व ग्रामस्थांना जेसीबीच्या साहाय्याने ही कार उचलून बाहेर काढावी लागली. त्यातील चारही प्रवासी कार मध्येच दबले गेले होते. अपघात घडतात काही क्षणात नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे रुग्णवाहिका चालक निवृत्ती गुंड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व कार मधील मृतदेह रुग्णवाहिक घोटी ग्रामीण रुग्णालात दाखल केले.
घटना घडताच काही वेळातच घोटी येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे पाटील यांच्यासह इगतपुरीच्या निरीक्षक सारिका आहीरराव महामार्ग पोलीस पथक आदींच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचे गांभीर्य ओळखून यंत्रणेला सहकार्य केले. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील विभागीय उपअधीक्षक हरीश खेडकर आदींनी घटनास्थळी भाव घेऊन घटनेची माहिती घेऊन तपास कामी सूचना दिल्या.
बलगर टँकर चालक सुरेंद्र कुमार वर्मा याल घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. चालकाने मद्य प्राशन केल्याचे समजले आहे.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी दोन्ही वाहने एकाच मार्गावर असल्याने नाशिक बाजू कडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघात ग्रस्त कार व त्यातील मृत प्रवासी हे क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत होते. त्यावेळी या मार्गावरील वाहतूक जवळपास काही काळ ठप्प होती. या कुटुंबात मृत व्यक्तीच्या पश्चात आता केवळ त्या एकच वृद्ध भगिनीच आहेत असे उर्वरित भाविकांनी नमूद केले.