

भारताची दक्षिण गंगा अशी ओळख असणाऱ्या गोदावरी नदीतील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या अहवालात गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालाने अनेकांना आश्चर्यचकित केले असून, पर्यावरणप्रेमींनी या दाव्याच्या आधारांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मंडळाने हा निष्कर्ष नेमका कशाच्या आधारे काढला, याची स्पष्टता आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला गोदावरी नदीतील प्रदूषणाची मात्रा मोजली जाते आणि त्यासंदर्भातील अहवाल शासनास सादर केला जातो तसेच अधिकृत संकेतस्थळावरही प्रकाशित केला जातो. २०२४ ते २०२५ या कालावधीत सादर केलेल्या अहवालांमध्ये गोदावरी नदीतील पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक (डब्ल्यूक्यूआय) उत्तम असल्याचा उल्लेख आहे. मंडळाने शहर आणि ग्रामीण भागातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या १० ठिकाणी पाण्याचे नमुने तपासले असून, त्या सर्व नमुन्यांमध्ये पाणी स्वच्छ असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, गोदावरी नदीतील बकाल चित्र पाहता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा निष्कर्ष हास्यास्पद असल्याच्या प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून उमटत आहेत.
ठिकाण - डब्ल्यूक्यूआय
गंगापूर धरण - ७४.५१
रामकुंड, पंचवटी - ६५.८५
अमरधाम - ६४.७४
सोमेश्वर मंदिर - ७०.५२
हनुमान घाट - ६२.१६
तपोवन - ६३.०२
सायखेडा - ६४.९७
नांदूरमध्यमेश्वर बंधारा - ७०.६०
चिखली नाला, आनंदवली - ३३.७७
गोदावरी-कपिला संगम बिंदू - ५८.९०
(सदर वॉटर क्वाॅलिटी इंडेक्स डिसेंबर २०२४ या महिन्यातील आहे)
- गंगापूर धरणातील पाणी बाराही महिने स्वच्छ
- रामकुंड येथे पाणी स्वच्छ, केवळ जुलै महिन्यातच (६१.०६) पाण्याची गुणवत्ता चांगली.
- अमरधाम येथे पाणी स्वच्छ, केवळ जूनमध्ये (५३.४१) गुणवत्ता चांगली, तर जुलैमध्ये (४६.७८) खराब.
- सोमेश्वर मंदिर परिसरात केवळ एप्रिलमध्ये (६२.६०) पाण्याची गुणवत्ता चांगली.
- हनुमान घाट येथे जुलै (५८.६४), नोव्हेंबरमध्ये (६२.१६) पाण्याची गुणवत्ता चांगली.
- तपोवनात एप्रिल (५९.६८) आणि मे (५८.६३) महिन्यात पाणी गुणवत्ता चांगली, तर जूनमध्ये (४६.७४) खराब. तसेच ऑगस्ट (६१.९४), ऑक्टोबर (६२.६१) आणि नोंव्हेंबरमध्ये (६२.३०) पुन्हा चांगली असल्याची नोंद.
- गोदावरी-कपिला संगम बिंदूवर पाणीची गुणवत्ता उत्तम असून, जून (५२.४५), ऑक्टोबर (६१.९७) आणि डिसेंबर (५८.९०) महिन्यात ती खालावल्याचे अहवालात नमूद.
- सायखेडा येथे गोदामाईचे पाणी स्वच्छ. केवळ जूनमध्ये (५५.९३) पाण्याची गुणवत्ता चांगली.
- नांदूरमध्यमेश्वर येथे गोदावरीचे पाणी बाराही महिने शुद्ध असल्याचे अहवालात नमूद.
(सदर आकडेवारी २०२४ या वर्षातील आहे)
आनंदवली येथील चिखली नाल्यातील गोदावरी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सर्वाधिक अस्वच्छ असल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात आहे. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत येथील पाण्याची गुणवत्ता सातत्याने खराब आढळली. नोव्हेंबरमध्ये ती सर्वसाधारण (६१.७६) होती, तर डिसेंबर २०२४ मध्ये अतिखराब (३३.७७) झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
६३ ते १०० - चांगले ते उत्कृष्ट
५० ते ६३ - मध्यम ते चांगले
३८ ते ५० - वाइट
३८ पेक्षा कमी - खूपच वाइट
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मासिक अहवालानुसार, गोदावरीचे पाणी स्वच्छ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीअंती गोदावरीत सांडपाण्यामुळे तब्बल ८५ टक्के प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट होते. विविध ठिकाणी नाल्यांचे थेट विसर्ग व भाविकांकडून निर्माल्याचे विसर्जन ही मुख्य प्रदूषणाची कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंडळाने अहवाल तयार करण्यासाठी कोणते निकष वापरले, याबाबत पर्यावरणप्रेमींनी शंका उपस्थित केली आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील कार्यक्रमात गोदावरी नदी प्रदूषित असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाला ती प्रदूषित नसल्याचा साक्षात्कार नेमका कोणत्या आधारे झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गोदावरीच्या पाण्याची उपरोधिक तुलना 'मिनरल वॉटर'शी केली होती.
नदीपात्रातील काही ठिकाणचे नमुने घेऊन दर महिन्याला त्याबाबतचा अहवाल सादर केला जातो. वास्तविक, महापालिका हद्दीतील गोदावरी नदी पट्टा अगोदरच प्रदूषित म्हणून घोषित केला आहे. वॉटर क्वॉलिटी इंडेक्स पाच निकषांवर ठरविला जात असल्याने, काही ठिकाणी प्रदूषित काही ठिकाणी स्वच्छ पाणी म्हणून अहवालात दर्शविले आहे.
- प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी.
जानेवरी ते डिसेंबर २०२४ च्या एमपीसीबी अहवालातील आकडेवारी बघितल्यास गोदेच्या पाण्याचा वॉटर क्वॉलिटी इंडेक्स सरासरी ७५ इतका जातो. म्हणजेच सर्रास गटारीचे पाणी गोदापात्रात सोडूनदेखील गोदेचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे अहवाल दर्शवितो. मग गोदावरी शुद्धीकरणासाठी येणाऱ्या हजारो कोटींची गरज काय? 'एसी'मध्ये बसून हा अहवाल तयार केला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर ४२० चा गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यांना निलंबित करायला हवे.
-देवांग जानी, पर्यावरणप्रेमी