

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाढत्या बिबट्या-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संवेदनशील मुद्द्याची गंभीर दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली असून, नाशिकसाठी स्वतंत्र 'लेपर्ड सफारी अँड कंझर्वेशन प्रोजेक्ट' मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.
गेल्या पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नाशिक जिल्ह्यात ३५ हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ६२ हुन अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवहानी बरोबरच पाळीव जनावरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले असून अधिकृत ६.१० कोटींची भरपाई वितरित करण्यात आली आहे. तरीदेखील बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांचे प्रमाण कमी न होता वाढतच आहे. अलीकडेच वडनेर गेट परिसरात दोन वर्षीय बालकाच्या मृत्यूच्या घटनेने जनतेत संतापाची लाट उसळली होती.
देवळालीगाव, पिंपळगाव खांब, वडनेर गेट परिसरात नागरिकांनी आंदोलन करत वनविभागाच्या अपुऱ्या पिंजऱ्यांविषयी, उशिरा प्रतिसाद देणाऱ्या पथकांविषयी आणि निष्क्रिय यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली होती. एप्रिल ते जून २०२५ या काळात वनारवाडी परिसरात तब्बल तीन बिबटे पकडण्यात आले, ही घटनांची गंभीरता दर्शवते, असेही वाजे यांनी यादव यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
ही केवळ वन्यजीव व्यवस्थापनाची बाब नसून मानवी सुरक्षा, सामाजिक समरसता आणि पर्यावरणीय संतुलन जपण्याचे आवाहन आहे. नाशिकच्या लोकांना पुन्हा सुरक्षिततेचा विश्वास मिळावा आणि निसर्गाशी असलेले संतुलन पुनर्स्थापित व्हावे, यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत.
राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक.
रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील 'लेपर्ड सफारी प्रोजेक्ट', सातारातील 'माणिकडोह रेस्क्यू सेंटर' आणि राजस्थानमधील 'जयपूर लेपर्ड रिझर्व्ह' ही यशस्वी उदाहरणे आहेत. अशा प्रकारचा समर्पित लेपर्ड सफारी आणि संवर्धन प्रकल्प नाशिकमध्येही उभारल्यास पर्यावरणीय संतुलन, पर्यावरण शिक्षण, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळू शकते, अशी मागणी खा. वाजे यांनी केली आहे.