

नाशिक : निल कुलकर्णी
'आमची मुल- सुना नातवंडे आहेत मात्र थकलेल्या शरीर, जडलेल्या व्याधी आणि वार्ध्यक्यात त्यांना आमची सुश्रुषा करणेही जमत नाही. मात्र ते फोनवरुन आमची ख्याली खुशाली विचारतात पैसेही पाठवतात. आपणही समजून घेतले पाहीजे. ते प्रत्यक्ष आमची सेवा करु शकत नाही. रोज भलेही संवादही होत नसेल. मात्र त्यांचे प्रेमही आई म्हणून जराही कमी नाही. मुलांसाठी आम्ही कायम आशीर्वाद देत राहु ' अशी भावना वृद्धांश्रमातील आजी आजोबांनी व्यक्त केली. पाणावलेल्या डोळ्यांनी आपली कहाणी सांगणाऱ्या आजी आजोबांना मातृदिन असतो, याची कल्पनाही नव्हती.
जगभरात रविवारी (दि.११) मातृदिन साजरा होत असताना आयुष्याच्या सांजवेळी आधार झालेल्या वृद्धांच्या गावी मातृदिनाची पुसटशीही कल्पना नव्हती. मुले- सुना नातवंडे असूनही कुणी व्याधींनी जर्जर म्हणून सुश्रुषा करण्यास अक्षम ठरलेले तर कुणी नोकरी व्यवसायमुळे आजारी मायबापांची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवलेले. मात्र या सर्वच आजी-आजोबांनी वृध्दाश्रमातील जीवन स्वीकारुन मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देताना दिसून दिले. शहरातील राजीवनगर भागातील एका वृद्धाश्रमात कोणी वृद्धा स्वेटर विणत एकाकीपण घालवत हाेती तर कुणी टीव्हीवरील कार्यक्रम पाहत होते. काही आजी- आजोबांना मुलं नव्हते तर काहींना मुले आहेत परंतु विविध कारणांनी त्यांना वृद्धाश्रमात राहण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी आश्रमालाच घर केल्याचे दिसून आले.
मुंबईच्या ७३ वर्षीय कांचन भंडारी कंपवाताने अंथरुणाला खिळलेल्या आहेत. त्यांचा एक मुलगा 'मर्चंट नेव्ही'मध्ये तर दुसऱ्याचीही नोकरी. सुनाही नोकरीत व्यग्र. जडलेल्या व्याधी आणि थकलेल्या शरीराने त्यांना बेडवरुन उठणेही अशक्य, पतीच्या माघारी आबाळ हाेऊ नये, म्हणून मुलांनी आईच्याच इच्छेने त्यांना वृद्धाश्रमात आणले. मुले रोज फोनवरुन त्यांची ख्यालीखुशली विचारत असतात. आजारपणासाठी पैसेही पाठवतात. मुलांना वेळ नसल्याने भंडारी आजींनी वृद्धाश्रमाचे जीवन हसत स्वीकारले. अशी अनेक जोडपी वृद्धाश्रमात आयुष्याची संध्याकाळ सोनेरी करताना दिसली.
अरुण कानडे आणि स्नेहप्रभा कानडे हे वृद्ध दांम्पत्य वृद्धाश्रमात राहायला आले कारण त्यांना मुलं नाहीत. त्यांच्या जवळचे नातेवाईक नियमित त्यांची चाैकशी करतात. कानडे आजींचे भाच्चे त्यांना फोन करतात. परंतु त्यांना वृद्धाश्रमातील जीवनाचा तिटकारा नाही. मुलं नसल्यामुळे आपल्याला वृद्धाश्रमाचाच पर्याय आहे हेही त्यांनी स्वीकारलेले. कानडे आजींना वृद्धाश्रमाचाच आधार वाटतो. पतीची काळजी घेत त्या आपला दिवस संवाद, टीव्हीत घालवता. कानडे आजोबा उमेदीच्या काळातील आठवणींं जागवतात आणि टीव्ही, पेपरवाचून मनोरंजन करुन घेतात.
तारुण्यात जोडीदारविणा आयुष्य कंठता येते मात्र, वार्ध्यक्यात थकलेल्या हाताना आधार हवाच. कळवण येथील नांदुरीचे आनंदाश्रमात राहणाऱ्या ८५ वर्षाचे आजोबा संतोष आणि ८३ वर्षांच्या जाईबाई यांचा पुनविर्विह येत्या रविवारी (दि.१८) होणार आहे. आनंदाश्रमातील विश्वस्तच हा विवाहसोहळ्याचे नियाेजन करत आहेत. सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचही उपस्थिती लाभणार असून संपूर्ण राज्यात हा विवाह औत्सुक्याचा विषय ठरला आहे.