Nashikroad Jail Road 2026 | सिंहस्थातील रस्तेकामांत त्रुटी; 12 ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई

Nashikroad Jail Road 2026 | दररोज 2.81 लाखांचा दंड : 28 रस्ते कामांच्या गुणवत्तेचा ठपका
Nashikroad Jail Road 2026
Nashikroad Jail Road 2026
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या २८ रस्ते विकासकामांच्या गुणवत्तेबाबत आणि कामांच्या संथगतीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. महापौर हिमगौरी आहेर - आडके आणि आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष रस्ते कामांची पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणी अनियमितता व विलंब आढळून आला. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने तब्बल १२ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी महापालिकेमार्फत सुमारे १,२३० कोटी रुपयांच्या खर्चातून हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, कामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड होत असल्याच्या तसेच निकृष्ट साहित्याचा वापर व घाईघाईत कामे होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर - आडके, आयुक्त मनीषा खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी विविध कामांची तपासणी केली. या पाहणीत काही ठिकाणी दर्जात्मक त्रुटी, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि अपेक्षित प्रगती झाल नसल्याचे समोर आले.

महापौरांकडून ठेकेदारांची झाडाझडती

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचणे, नागरिकांना होणारा त्रास आणि कामांच्या गुणवत्तेबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौर हिमगौरी आहेर - आडके यांनी ठेकेदारांची विशेष बैठक घेतली. यावेळी सुरक्षाविषयक उपाययोजना, कामांची गती आणि दर्जा यावरून त्यांनी ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरले. कामांमध्ये तातडीने सुधारणा न झाल्यास आणखी कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले की, सिंहस्थाची कामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तेबाबत तडजोड किंवा अनावश्यक विलंब खपवून घेतला जाणार नाही. काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. महापौर हिमगौरी आहेर - आडके यांनीही नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेतल्याचे सांगत, सिंहस्थाशी संबंधित सर्व कामांमध्ये गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासन व ठेकेदारांना दिले आहेत.

प्रतिदिन ५० ते ९१ हजारांचा दंड

महापालिकेने दिरंगाई करणाऱ्या नऊ ठेकेदारांना प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली आहे, तर कामाच्या गुणवत्तेशी तडजोड केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांवर प्रतिदिन ५० हजार रुपये आणि एका ठेकेदारावर प्रतिदिन २१ हजार रुपये दंड लावण्यात आला आहे. अशा प्रकारे संबंधित १२ ठेकेदारांकडून एकूण प्रतिदिन २ लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. कामे समाधानकारक पद्धतीने पूर्ण होईपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news