

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्र व १०० मीटर परिसरामध्ये मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले आहेत.महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे.
मतदानासाठी शहरात विविध ठिकाणी १,५६८ मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. या मतदान केंद्रांत महापालिकेच्या माध्यमातून मतदारांसाठी विविध सेवासुविधा पुरविण्यात येत आहेत. मतदार जागृतीचा भाग म्हणून मतदान केल्यानंतर मतदारांसाठी सेल्फी पॉइंटदेखील उभारले जाणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर मतदानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचनादेखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतदारांना देण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांनुसार मतदान केंद्र तसेच १०० मीटर परिसरामध्ये मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस फोन वापरण्यास प्रतिबंध केलेला आहे. त्यामुळे मतदाराने मतदानास येताना आपला मोबाइल फोन सोबत आणू नये. मोबाइल फोन शक्यतो आपल्या घरीच ठेवावा. किंवा १०० मीटरच्या बाहेरच मोबाइल फोन ठेवण्याची व्यवस्था करावी.
...तर होणार कारवाई!
मोबाइल फोन १०० मीटरच्या आत आढळल्यास संबंधित मतदारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे मतदान केंद्रांत मतदानास येताना मतदारांनी मोबाइल आणू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.