MMC Malegaon News | मालेगावात तीन हजार जन्म प्रमाणपत्रे रद्द
मालेगाव : शहरातील बहुचर्चित जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळ्यातील सुमारे तीन हजार जन्मदाखले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने संबंधितांना याबाबत नोटिसा पाठविल्याने खळबळ उडाली आहे.
आयुक्तांच्या सूचनेनुसार आरोग्याधिकारी यांच्या स्वाक्षरीने या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, नायब तहसीलदार यांनी हे प्रमाणपत्र दिले असल्याचे सांगून ते रद्द करण्यात येत आहे. नायब तहसीलदार यांना तहसीलदार यांनी अधिकार दिले होते. यांत संबंधित प्रमाणपत्रधारकांना दोषी का समजले जाते, असा सवाल करत याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे समन्वयक माजी आमदार आसिफ शेख व मुश्तकिम डिग्निटी यांनी रविवारी (दि. २५) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळ्यात महानगरपालिकेचे लिपिक अब्दुल तवाब शेख हे प्रमुख संशयितांपैकी एक आहेत. छावणी पोलिस ठाण्यात दाखल जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील रजिस्टर क्रमांक ४० व ५१ या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचे आरोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. शहरात कुठेही बांगलादेशी अथवा रोहिंगे आढळल्याचा उल्लेख नाही. तथापि, शहराच्या बदनामीसाठी हे एक षडयंत्र असल्याचा आरोप मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने केला आहे.
जन्मदाखला प्रमाणपत्र अचानक रद्द केल्याने संबंधित मुलांच्या शैक्षणिक प्रवेश व विविध शासकीय योजनांच्या कामकाजात अडथळे निर्माण होणार आहे. प्रमाणपत्र रद्द झालेल्यांनी जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील समाजवादी पक्ष कार्यालय अथवा माजी आमदार शेख यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आहे.
जन्म प्रमाणपत्र घोटाळा : संशयित लिपिकाला पुन्हा पोलिस कोठडी
राज्यभरात गाजत असलेल्या जन्म दाखला प्रमाणपत्र घोटाळ्यात महानगरपालिका लिपिक अब्दुल तवाब शेख यास छावणी पोलिस ठाण्यात दाखल वेगळ्या गुन्ह्यात नव्याने अटक करण्यात आली. छावणी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणी एसआयटी तपास करीत आहे. दरम्यान, संशयित मनपा लिपिक अब्दुल तवाब शेख यास दुसऱ्यांदा अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवस (दि. २९ मे पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी अब्दुल तवाब न्यायालयीन कोठडीत होता. त्याने मनपा जन्म- मृत्यू विभागाकडून दिलेले काही दाखले बोगस व एजंटमार्फत दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

