

चांदवड ( नाशिक ) : अवैधरीत्या गौण खनिजांची वाळूमाफियांद्वारे सर्रासपणे मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने तस्करी केली जात आहे. या अवैधरीत्या वाळूची तस्करी करणाऱ्या माफियांना धडा शिकवण्यासाठी चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार अनिल चव्हाण यांनी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत पहिल्याच दिवशी दोघा वाळूमाफियांना अवैध वाळूची तस्करी करताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर ४ लाख ६६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अनिल चव्हाण यांनी दिली.
तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्ग, मालेगाव- मनमाड, मनमाड-लासलगाव, चांदवड-निफाड, चांदवड-देवळा असे राज्यमार्ग गेले आहे. या रस्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाळू, मुरुमाची अवैधरीत्या तस्करी केली जात आहे. शासनाकडून चार ते पाच ब्रास रॉयल्टी फाडून वाहनात ८ ते ९ ब्रासपर्यंत वाळू, मुरूम, खडीची तस्करी सुरू आहे. याबाबत विचारणा केल्यास संबंधित रॉयल्टी फाडल्याचा बहाणा करत आहे. या कारवाईवर महसूल, स्थानिक पोलिस तसेच वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा होत असल्याने वाळूमाफियांची दिवसेंदिवस मुजोरी वाढली आहे. किरकोळ माफियांवर कारवाई करत महसूल अधिकारी मोठ्या तस्करांना अभय देत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी ठेकेदारांनी रीतसर शासकीय रॉयल्टी भरून वाहतूक करावी. जेवढी रॉयल्टी असेल तेवढाच मुद्देमाल वाहनात असावा. अन्यथा संबंधितांवर रीतसर दंडात्मक कारवाई केली जाईल. यासाठी स्वतंत्र भरारी पथके तयार केली आहेत.
अनिल चव्हाण, तहसीलदार, चांदवड
चांदवडच्या तहसीलदार पदभार अनिल चव्हाण यांनी स्वीकारला. पदभार स्वीकारताच चव्हाण यांनी आपला मोर्चा अवैध वाळूमाफियांकडे वळवला. मालेगाव-मनमाड रस्त्याने अवैधरीत्या वाळू घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांना (एमएच ४१ एयू. ८६६८ व एमएच १८ सीजी ९६८७) तहसीलदार चव्हाण यांनी ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता शासकीय रॉयल्टीपेक्षा प्रत्येक वाहनात चार ब्रास अतिरिक्त वाळू आढळली. या वाहनांना तहसीलदार चव्हाण यांनी ताब्यात घेत तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करत त्यांच्यावर ४ लाख ६६ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.