

नाशिक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील गाळे प्रकल्पातील १६२ गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण केली जाणार असून, त्यासाठी एमआयडीसीकडून हालचालींना वेग आला आहे.
२०७ गाळ्यांच्या या प्रकल्पातील १६२ गाळ्यांच्या लिलावाची जाहिरात दि. २२ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत ६ मेेपर्यंत होती. मात्र, तांत्रिक अडचण उद्भवल्याने दि. १२ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, १६२ पैकी केवळ १६ औद्योगिक आणि एका व्यापारी गाळ्यासाठीच दोन किंवा त्याहून अधिक निविदा एमआयडीसीला प्राप्त झाल्याने याच गाळ्यांची लिलाव प्रक्रिया होणार आहे, तर उर्वरित १४० औद्योगिक व पाच व्यापारी गाळ्यांपैकी ३० गाळ्यांना प्रत्येकी एकच निविदा प्राप्त झाली असून, ११५ गाळ्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या धोरणानुसार, एक किंवा त्यापेक्षा कमी निविदा प्राप्त गाळ्यांचा लिलाव करता येणार नाही. मात्र, दोन किंवा त्यापेक्षा अधिक निविदा प्राप्त १७ गाळ्यांचा पुढील आठ ते दहा दिवसांत लिलाव केला जाणार असून, त्यासाठी एमआयडीसी स्तरावर हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ज्या उद्योजकांना लिलावात स्थान मिळाले नाही, अशा उद्योजकांना दिलासा देण्यासाठी लगेचच उर्वरित १४५ गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गाळे लिलाव प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. तसेच ज्या उद्योजकांना लिलाव प्रक्रियेत सहभाग घेता आला नाही, त्यांच्यासाठी लवकरच पुढील जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रत्येकास उद्योग उभारता यावा, हे एमआयडीसीचे धोरण असून, त्यासाठी साह्यभूत सर्व बाबी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
दीपक पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक.
गाळे लिलाव प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, या उद्योजकांच्या मागणीला प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेेक्षा आहे. प्रत्येक उद्योजकाला गाळा मिळावा ही आमची भावना आहे.
राहुल भार्गवे, उद्योजक.