

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या खासगी विद्यापीठ स्थापनेच्या सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरून अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले यांच्यात जुंपलेली असतानाच आता माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी विद्यापीठ स्थापनेला कडाडून विरोध केला आहे.
विद्यापीठ स्थापनेने संस्थेच्या मालक सभासदांच्या हक्कावर गदा येणार असून, कार्यकारिणीला धोका होणार आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद होणार असून सरकारी अनुदानही बंद होणार आहे. त्यामुळे सभासदांच्या हितासाठी खासगी विद्यापीठ स्थापन होऊ देणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच खाजगी विद्यापीठाएेवजी रयत शिक्षण संस्थेच्या धर्तीवर समूह विद्यापीठ हा यावर उत्तम पर्याय असल्याने त्यांचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मविप्र संस्थेच्या सर्वसाधारण सभेत असलेल्या खासगी विद्यापीठ स्थापन विषयांच्या अनुषगांने पवार यांसह अध्यक्ष डाॅ. ढिकले, माजी अध्यक्ष अरविंद कारे, माजी सभापती माणिकराव बोरस्ते, माजी संचालक मोहन पिंगळे, दिलीप मोरे, सचिन पिंगळे, भाऊसाहेब खताळे, बाळासाहेब कोल्हे, लक्ष्मीकांत कोकाटे यांनी शुक्रवार (दि.12) पत्रकार परिषदेत घेऊन विद्यापीठाबाबतची भूमिका मांडत, त्यास विरोध दर्शविला.
मुळातच, विद्यापीठ स्थापन करण्याचा विषय हा घटनाबाह्य आहे. कार्यकारिणीला अंधारात ठेवून हा निर्णय सरचिटणीसांनी घेतला आहे. संस्थेचे सभासद हे सर्वोच्च आहेत, 70 टक्के सभासद हे शेतकरी आहे. मात्र, हा विषयातून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. निर्मितीनंतर नव्या रचनेत जुन्या कार्यकारिणीतील सर्वांनाच लोकशाही मार्गाने स्थान मिळेल काय? आणि सर्वसाधारण सभेत हा विषय येण्याआधीच त्याची घाई का याचे उत्तर अॅड. ठाकरे यांनी सप्रमाण द्यावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. ढिकले यांनी दिले. खासगी विद्यापीठाचा निर्णय घेताना लोकशाही मार्गाने जाणाऱ्यां शिक्षणसंस्थांनी आपले अधिकार गमवावे का? याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. याशिवाय विद्यापीठात जर आपल्या सभासदांचेच अधिकार संपुष्टात येणार असतील तर कर्मवीरांच्या मूळ उद्देशालाच खो बसेल, असा दावा बोरस्ते यांनी केला. विद्यापीठाला द्यायची जागा मध्यवस्तीतील आहे. तिची किंमत ४०० कोटी रुपये आहे. ती जागा विद्यापीठाला दिल्यास त्याचा वापर संस्थेला करता येणार नाही. याशिवाय विद्यापीठाच्या नियमांचे पालक करण्यास संस्था अपयशी ठरली तर सर्व मालमत्ता शासनजमा होऊन संस्थेचे नुकसान होणार असल्याचे नीलिमा पवार यांनी निर्देशनास आणून दिले.
मविप्र समाजाच्या प्रस्तावित खासगी विद्यापीठाला आमचा ठाम विरोध असून त्यानंतरही सर्वसाधारण सभेत हा विषय रेटून नेल्यास त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा नीलिमा पवार यांनी यावेळी दिला. विद्यापीठाची गरजच काय सामाजिक हित ठेवून गरिबांसाठी काम करणाऱ्या संस्थेला हे परवडणारे नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी घेतलेल्या विद्यापीठ स्थापनेच्या निर्णयाला, कार्यकारिणीतील निम्याहून अधिक सदस्यांचा विरोध असल्याचा दावा अध्यक्ष डॉ. ढिकले यांनी यावेळी केला. पुणे येथे विद्यापीठ पाहणी दौऱ्यालाही अनेक संचालकांनी पाठ फिरविली होती. कार्यकारिणीच्या बैठकीत विरोध केला नाही म्हणजे, निर्णयाला त्यांचा पाठींबा आहे असे होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.