

नाशिक : जिल्ह्यामधून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्यासोबत लाखो मराठा समाजबांधव मुंबई येथे लढा देत आहेत. या आंदोलकांची जेवणाची व्यवस्था जिल्ह्यातील विविध तालुके व शहरातून केली जात असून, आतापर्यंत तब्बल २० पिकअप वाहने अन्नसामग्री घेऊन मुंबईला पाठविण्यात आली आहेत.
चपाती- भाकरी, ठेचा, लोणचे, पाण्याच्या बाटल्या, राजगिऱ्याचे लाडू, बिस्किटे, चिवडा, भत्त्याची पाकिटे आदी साहित्य पाठविले जात असून, सुमारे ५० हजार लोकांना जेवण मिळेल इतकी व्यवस्था जिल्ह्यातून केली जात आहे. याशिवाय जिल्ह्यातून आर्थिक रसदही पुरवली जाणार आहे. दरम्यान, रविवारी (दि. ३१) नाशिकचे ग्रामदैवत मुंबई नाका येथील कालिका माता मंदिर या ठिकाणी दिंडोरी, नाशिक ग्रामीण तालुक्यातील गिरणारे, मखमलाबाद, दुगाव, दरी तसेच नाशिकरोड, सिन्नर, येवला या भागांतील विविध गाव- खेड्यांतून ही वाहने जमा झाली होती. ही सर्व वाहने मुंबईला पाठविण्यात आली.
या अन्नदानासाठी सक्रिय मदत करणाऱ्या जिल्ह्यातील समाजबांधवांचे नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी करण गायकर, नानासाहेब बच्छाव, केशव पाटील, विलास पांगारकर, नितीन सुगंधी, भारत पिंगळे, राम खुर्दळ, नितीन थेटे, योगेश नाटकर आदी उपस्थित होते.
ज्या समाजबांधवांना मुंबई येथील आंदोलनासाठी बिस्किटे, राजगिऱ्याचे लाडू, बिसलरी बॉक्स, चिवडा, भत्ता, कोरडा शिधा पाठवायचा असेल, त्यांनी मुंबई नाका येथील कालिका माता मंदिर येथे साहित्य जमा करावे. आपली मदत आपल्या समाजबांधवांच्या आंदोलनाला निश्चित ताकद देईल.
करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा.