

दिंडोरी : शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, विविध धरणांच्या जलपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पात धुवांधार पर्जन्यवृष्टी झाली असून, या प्रकल्पातून प्रवाहित होणारे पाणी पुणेगाव धरणात पोहोचू लागले आहे. धरण सध्या ७५ टक्के भरले असून, उनंदा नदीतून १०० क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विक्रम डावरे यांनी दिली. या पाण्यामुळे ओझरखेड धरणाच्या पातळीतही वाढ होऊन सध्या धरण ४४.२८ टक्के भरले आहे. याचा थेट लाभ वणी, दिंडोरी आणि चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना मिळणार आहे.
दरम्यान, शेतीसाठी महत्त्वाचे समजले जाणारे वाघाड धरणही ७१ टक्क्यांवर भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील सर्वात मोठा करंजवण प्रकल्प सध्या ५१ टक्के भरलेला आहे. यामुळे दिंडोरीसह येवला, नांदगाव (मनमाड) आणि निफाड तालुक्याच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यास दिलासा मिळाला आहे. दिंडोरीच्या पूर्व भागासाठी महत्त्वाचे असलेले तिसगाव धरणही २५.२५ टक्के भरले असून, तेथेही पाण्याची आवक सुरू आहे. पालखेड धरणात अनेक नद्यांमधून पाणी येत असून, सध्या धरणातून ६४६ क्यूसेक्स वेगाने कादवा नदीत विसर्ग सुरू आहे. हे पाणी पुढे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडी धरणात जात आहे. एकीकडे धरणं भरत असली तरी सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्याने शेतकरी पावसाच्या उसंतीकडे डोळे लावून बसले आहेत.
करंजवण - 51.3 टक्के
पालखेड -52.37 टक्के
वाघाड -71 टक्के
पुणेगाव -75.32 टक्के
ओझरखेड -44.28 टक्के
तिसगाव -25.25 टक्के
दिंडोरी -74 मिमी
रामशेज -38 मिमी
ननाशी -38 मिमी
उमराळे -56 मिमी
लखमापूर -26 मिमी
कोशिंबे -21 मिमी
मोहाडी -41 मिमी
वरखेडा -23 मिमी
वणी -32 मिमी