Manisha Khatri Nashik : नाशिकला इंदूरपेक्षा स्वच्छ शहर करणार

मनीषा खत्री : सिंहस्थाला प्राधान्य, गोदावरीत जलवाहतूक अन् वॉटर स्पोर्ट्स
नाशिक
नाशिक महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : 'स्वच्छ, सुंदर, हरित शहर' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकला इंदूरपेक्षाही स्वच्छ शहर करण्याचा संकल्प महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी बोलून दाखविला. आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाला प्राधान्य दिले जाणार असून, गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्ती व संवर्धनासाठी योजना राबवितानाच गोदावरी पात्रात जलवाहतूक व आगामी आॉलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याचा मानसही खत्री यांनी व्यक्त केला.

Summary

आयुक्त खत्री यांच्या संकल्पना

  • नोकरभरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

  • हॉकर्सधारकांचे पुनर्वसन करून अतिक्रमण काढणार

  • महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करणार

  • तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सुविधा देणार

  • यत्रणांसमवेत समन्वय ठेवून काम करणार

  • कमीत कमी वेळेत लोकांना सेवा देण्यास प्राधान्य

  • भूसंपादनातील अनियमिततेबाबत शासनाला कळवणार

महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती झाल्यानंतर खत्री यांनी शुक्रवारी (दि. २७) कामकाजाला सुरुवात केली. खातेप्रमुखांकडून महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाशिककरांप्रति संवेदना व्यक्त करताना नागरिकांना जलद व उत्तम सेवा देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक हे स्वच्छ व सुंदर शहर आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकला देशभरातील पहिल्या 10 स्वच्छ व सुंदर शहरांमध्ये नाशिकला आणण्यास माझे प्राधान्य राहणार आहे. नाशिकला यात पुढे नेण्याची खूप मोठी संधी आहे. त्यामुळे यासाठी आपण एक रोडमॅप तयार करणार असून इंदूरपेक्षा नाशिकला पुढे नेणार असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. महापालिका कामकाजात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून विकासकामांचे नियोजन केले जाणार आहे. मूलभूत सुविधांचा दर्जा वाढविणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेची विकासकामे करताना निधीची उपलब्धता हादेखील महत्त्वाचा भाग आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट केली जाईल. तसेच सिंहस्थ कुंभमेळा तसेच गोदावरी हा प्राधान्याचा विषय असून, भविष्यात गोदावरीवर जलवाहतूक तसेच वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याच्या दृष्टिकोनामधून नियोजन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. शासन, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी समन्वय ठेवून शहराच्या विकासाला आपले प्राधान्य राहील असेही त्यांनी सांगितले.

ई- फाइल संकल्पना सुरू करणार

महापालिका कारभाराला गतिमान करण्यासह भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी फायलींचा प्रवास कमी करणार आहे. त्यासाठी महापालिकेतील टेबलची संख्या कमी करून कामांचे विकेंद्रीकरण व नागरिकांना अधिक जलद सेवा सुविधा मिळवून दिली जाईल. त्यासाठी ई- फाइल संकल्पना राबवणार आहे. आयुक्तांची बदली झाली की, त्यांनी सुरू केलेले सॉफ्टवेअर बंद होतात. त्यामुळे शासनाचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा वापर कामकाजात केला जाणार असून, ऑनलाइन कामांवर आपला भर असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मूलभूत सुविधांना प्राधान्य

नाशिककरांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्यासह शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास आपले प्राधान्य असणार असल्याचे आश्वासन नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठीही आपले प्रयत्न राहणार असून, समन्वयाने शहर विकासाला गती दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

भूसंपादन प्रकरणांसह काही ठिकाणी अनियमितता झाली असेल, तर त्यासंदर्भात शासनाला कळवणार आहे. विकासकामांसाठी प्राथमिकता ठरवून सर्व विभागाशी समन्वय ठेवून काम केले जाईल. नागरिकांना त्रास कमी होण्यासाठी ऑनलाइन कामाला प्राधान्य दिले जाईल.

मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news