

देवळाली कॅम्प : ॲड. माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांना ऊर्जितावस्थेत आणून कृषी विभागात नवे धोरण राबवून राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे साकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी घातले होते. या मागणीची दखल घेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मालेगाव नजीकच्या काष्टीतील कृषी महाविद्यालयाला भेट देत तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. कृषी महाविद्यालयांचा दर्जा उंचावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कृषीमंत्री ॲ़ड. माणिकराव कोकाटे हे प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले असता, मनसेचे खंडेराव मेढे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी झालेल्या चर्चेत व दिलेल्या निवेदनात शेतकरी आत्महत्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात कृषी मंत्रालय व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्था, विद्यापीठे यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांना ऊर्जितावस्थेत आणून त्यातून पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याची मागणी मेढे यांनी केली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त दै. पुढारीत प्रसिध्द झाले होते.
काष्टी येथील कृषी महाविद्यालयाला रविवारी कोकाटे यांनी भेट देत कृषी क्षेत्रातील शिक्षण पध्दती, विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान, प्रयोगशाळा याबाबत तेथील प्राध्यापक आणि प्राचार्यांशी चर्चा केली. यावेळी मत्री दादासाहेब भुसे हेही उपस्थित होते. त्यांच्याशी कोकाटे यांनी चर्चा करत महाविद्यालयांना सरकारकडून कोणत्या स्वरुपात मदत दिली पाहिजे, याबाबतही सविस्तर चर्चा केली. या चर्चेत कोकाटे यांनी दैनिक पुढारीत प्रसिध्द झालेल्या बातमीचा उल्लेख केला. सरकार राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच कृषी महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी गुणवत्तेवर भर देणार असल्याचे सांगितले.