

नाशिक : गेल्या महिन्यात जिल्हाभरात अवकाळीने कहर केल्याने सुमारे 1,700 हेक्टरवरील आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात विविध भागांत आंब्यासह इतर फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात त्र्यंबक, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे.
एप्रिल महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होतो. आदिवासी भागातील हापूस आणि केशर आंब्याला बाजारात मोठी मागणी असते. मात्र, यंदा जिल्ह्यात 7 मेपासून वादळीवार्यासह अवकाळीने धुमाकूळ घातल्याने आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे पुढील आठ दिवसांत फळे नासतात, यामुळे पंचनामे करतानादेखील अडचण उभी राहते. जिल्ह्यातील सुमारे 1,700 हेक्टरवरील आंबा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्यांपुढे संकट आहे.
आंब्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर 100 ते 150 रुपये किलो या दराने आंब्याची विक्री केली जात होती. मात्र 10 मेपासून कळवण शहर व ग्रामीण भागामध्ये जवळपास रोज पाऊस सुरू असल्याने आंबा विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत गेल्या महिनाभरापासून अवकाळी बरसत आहे. अवकाळीच्या पावसामुळे ग्राहकांनी आंब्याकडे पाठ फिरविल्याने विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळे विक्रेत्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
जिल्ह्यातील त्र्यंबक, पेठ, सुरगाणा आणि कळवणसह जिल्ह्यात सुमारे 1,700 हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले आहे. एकट्या कळवणमध्ये 200 हेक्टर क्षेत्रावर केशर आंब्याची 1,500 झाडे आहेत. हा आंबा मे महिन्यात विक्रीयोग्य झाला असताना अवकाळीने उचल खाल्ली यामुळे विक्री मंदावली यामुळे यंदा उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मेनरोड व इतर फळबाजारांत केशर आंब्यासह गुजरात व इतर भागातून गावरान बदाम, नीलम, पायरी, लालबाग, लंगडा, राजापुरी आदी जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. केशर आंबा 60 ते 100 रुपये तर इतर प्रजातीच्या आंब्याची 50 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. पाऊस पडण्याआधी जो केशर आंबा 100 ते 150 रुपये किलोने विकला जात होता त्याचे दर सध्या खाली आले आहेत.