

देवळाली कॅम्प (नाशिक) : लोहशिंगवे गावातील सुदाम जुंद्रे या युवकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाने चार पिंजरे व चार कॅमेरे बसविले असून ड्रोनच्या माध्यमातून नरभक्षक झालेल्या बिबट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान गावकऱ्यांची भीती अद्यापही कमी झालेली नसून लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
सुदाम जुंद्रे या ३० वर्षीय युवकाचा शुक्रवारी (दि.7) पहाटे बळी घेणाऱ्या बिबट्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळनंतर गावकऱ्यांना घराबाहेर पडणे देखील जिकिरीचे झाले आहे. नरभक्षक झालेला हा बिबट्या दुसरा बळी घेण्यापूर्वी जेरबंद होणे गरजेचे आहे. याबाबत संपूर्ण गावकऱ्यांनी वनविभाग व पोलिसांकडे मागणी केल्यानंतर तातडीने वनविभागाने शनिवारी या परिसरात चार पिंजरे व चार कॅमेरे बसवले. तसेच ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. वन विभागाचे अधिकारी अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह पाटील, अशोक खांजोडे, सोमनाथ निंबेकर या अधिकाऱ्यांबरोबरच ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे, माजी सरपंच संतोष जुंद्रे, नारायण जुंद्रे, मंगेश पाटोळे यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पिंजरे बसविण्यात आले.