

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर ट्रक युनियन आणि ट्रान्स्पोर्ट मालकांमधील वादामुळे मालेगावच्या यंत्रमाग व वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रक संपामुळे कापडासह अन्य मालाची वाहतूक आणि वितरण ठप्प झाले होते. परिणामी, वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यापारी, यंत्रमागधारक आणि व्यावसायिकांची गैरसोय होत होती. अखेर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी यांच्या मध्यस्थीने आयोजित बैठकीत या वादावर तोडगा काढण्यात आला. त्यानंतर ट्रक संप मागे घेऊन मालाची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला ट्रान्स्पार्ट मालक, ट्रक युनियन तसेच यंत्रमागधारक आणि विणकर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संबंधित घटकांमध्ये चर्चा करून वादावर सामंजस्याने मार्ग काढण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या मालेगावच्या वस्त्रोद्योगाला दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित सर्व पक्षांकडून प्रत्येकी दोन प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच संबंधित कार्यालयाचा प्रतिनिधीही या प्रक्रियेत सहभागी होणार आहे. सर्व पक्षांमध्ये ठरलेल्या | अटी व शर्ती लेखी स्वरूपात नोंदवून त्यावर संबंधित प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहेत. केवळ मौखिक आश्वासनावर अवलंबून न राहता, सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख असलेला लेखी करार करण्यात यावा, अशी मागणी विणकर संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. या मागणीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे वाद निर्माण होऊ नयेत आणि ठरलेल्या अटींची अंमलबजावणी निश्चित व्हावी, या दृष्टीने लेखी करार महत्त्वाचा ठरणार आहे.
बैठकीत मध्यस्थी करून वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विणकर संघटनांच्या प्रतिनिधींनी मंत्री दादा भुसे आणि आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी यांचे आभार मानले. संप मिटल्याने मालेगावच्या वस्त्रोद्योगातील ठप्प झालेले व्यवहार पुन्हा सुरळीत होतील आणि उद्योगाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वस्त्रोद्योगाला पुन्हा गतीची अपेक्षा
ट्रक संपामुळे कापडाची वाहतूक आणि वितरण विस्कळीत झाल्यामुळे मालेगावच्या वस्त्रोद्योगातील व्यवहारांवर परिणाम झाला होता. संप मागे घेण्याचा निर्णय झाल्यामुळे मालाची वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे यंत्रमागधारक, विणकर, व्यापारी आणि वाहतूक व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.