मालेगाव : नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेतून सुमारे १२५ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 'व्होट जिहाद'चा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, गुरुवारी (दि. १४) सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली. संगमेश्वर भागात हवाला व्यापार्याच्या घरी छापा टाकण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील सिराज अहमद नामक व्यापार्याने तालुक्यातील १२ तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या नावे नामको शाखेत खाती उघडली. या खात्यातून सुमारे सव्वाशे कोटींचे आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार शिवसेना शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून उघड केला हाेता. फसवणूक झालेल्या तरुणांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, बँकेनेदेखील सदर खाती गोठवली. पोलिसांकडून बँकेसह संबंधित घटकांची चौकशी सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (दि. १३) मालेगावला भेट देत 'ईडी'सह सीबीआय या तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (दि. १४) ईडीच्या पथकाने संगमेश्वर भागातील आनंदनगर येथील रहिवासी असलेल्या एका हवाला व्यापार्याच्या घरी सकाळी १० च्या सुमारास छापा टाकला. सायंकाळी उशिरापर्यंत पथक ठाण मांडून होते. दरम्यान, या व्यापार्यास छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, या चौकशीत काय हाती लागले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
या प्रकाराची शहरासह तालुक्यात जोरदार चर्चा असून, चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.