

मालेगाव : शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात मालेगाव किल्ला पोलिसांना मोठे यश आले आहे. दोन सराईत वाहनचोरांना अटक करत त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींची किंमत सात लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक दर्शन दुग्गड यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी चोरीविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी मालेगाव किल्ला पोलिस ठाण्याचे स्वतंत्र तपास पथक तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. दरम्यान, मालेगाव किल्ला पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान अब्दुल समद जमील अहमद (२६, रा. इस्लामपुरा) आणि बिलाल अहमद खुशिद अहमद (३३, रा. अख्तराबाद) या दोघांनी दुचाकी चोरीची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जप्त केलेल्या दुचाकी मालेगाव, चाळीसगाव आणि संभाजीनगर येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक भुषण चव्हाण, आनंद चव्हाण, पंकज भोये, विशाल तावडे आणि अंबादास डामसे यांनी पार पाडली. यामुळे वाहन चोरट्यांत खळबळ उडाली आहे.