नाशिक : मालेगावमधील विकासकामांची पाहणी न करता ठेकेदारास बिले देत पदाचा गैरवापर करून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालेगाव महापालिकेतील आजी - माजी १५ अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचारासह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात शहर अभियंता कैलास राजाराम बच्छाव यांचाही समावेश आहे.
विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या फिर्यादीनुसार, १५ जणांनी संगनमत करून त्यांच्या पदाचा गैरवापर केला. बी. वाय. शाह फर्मचे ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शाह यांना केलेल्या कामांचे मूल्यमापन संशयितांनी केले नाही. तसेच कामावर झालेला खर्च योग्य प्रकारे होत आहे की नाही याचीही शहानिशा केली नाही. संशयितांनी त्यांची प्रशासकीय जबाबदारी टाळून ठेकेदारास पैसे देत गुन्हेगारी वर्तन केल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे. संशयितांनी स्वत:चा आर्थिक फायदा करून शासनासह मालेगाव महापालिकेच्या निधीतील २० लाख ६७ हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानुसार शहर अभियंता बच्छाव यांच्यासह सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता मुरलीधर देवरे, तत्कालीन कनिष्ठ अभियंता संजय जाधव, सेवानिवृत्त उपअभियंता राजेंद्र बाविस्कर, ठेकेदार सोहेल शाह, केबीएच पॉलिटेक्निकचे विभागप्रमुख दिनेश जगताप, तत्कालीन कनिष्ठ लिपीक नीलेश जाधव, तत्कालीन लेखा परिक्षक अशोक म्हसदे, तत्कालिन लेखाधिकारी कमरुद्दीन शेख, उत्तम कावडे, यांच्यासह एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.