

मालेगाव (नाशिक) : बकरी ईदनिमित्त कुर्बानीला विशेष महत्त्व दिले जाते. दरम्यान शहरातील संगमेश्वर भागातील सांडवा पूल परिसरातील मोसम नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रक्तमिश्रित पाणी येत असल्याने नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे यांनी महापालिकेच्या निषेधार्थ शरीराला शेंदुर फासून आंदोलन केले. मनपा आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर बोरसे यांंनी आंदोलन मागे घेतले.
दरवर्षी बकरी ईदला शहरात मोठ्या प्रमाणात कुर्बानी होते. यावेळी रक्तमिश्रित पाणी थेट मोसम नदी पात्रात येत असल्याने नदी प्रदूषणात वाढ होते. यावर वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, शनिवारी (दि.7) संगमेश्वर परिसरातील सांडवा पूल भागाजवळ मोसम नदी पात्रात रक्तमिश्रित पाणी येत असल्याचे नागरी सुविधा समितीचे बोरसे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या बोरसे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांसह सांडवा पूल या ठिकाणी महापालिकेविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले.
बोरसे यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रांत अधिकारी, मनपा प्रशासनासह पोलिस प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहून मनपा अधिकार्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्णय बोरसे यांनी घेतला होता. यावेळी भाजप शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन-चार दिवसात स्वतः मालेगावी येऊन बैठक घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर बोरसे यांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.