

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील शहराचे वेगळेपण सातत्याने आधोरेखित होत असते. महानगरपालिकेच्या कर भरण्यातही ही अनियमितता व वेगळेपण जाणवते. बहुसंख्य मालमत्ताधारक मार्चअखेरीस कर भरत असल्याने प्रशासनासमोर वसुलीचे मोठे आव्हान असते.
या आर्थिक वर्षात घरपट्टीची ४१ टक्के, तर पाणीपट्टीची ३३ टक्के वसुली झाली आहे. आगामी काळात उर्वरित ६० टक्के वसुली करताना प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. येथे आजवर वसुलीचे उद्दष्ट पूर्ण झालेले नाही.
मालेगाव महानगरपालिका मालेगाव थकबाकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरून सहकार्य करावे, यासाठी शहरातील विविध धर्मगुरूंची बैठक गुरुवारी (दि. ५) आयुक्त रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या परिषद दालनात पार पडली.
यावेळी उपस्थित धर्मगुरूंनी शहरातील नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या काही समस्या व सूचना आयुक्तांसमोर मांडल्या आयुक्त जाधव यांनी सांगितले, रस्ते, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा, कचरा संकलन आदी मूलभूत सुविधा नियमितपणे पुरविण्यात येतात. या सुविधांचा लाभघेणाऱ्या नागरिकांनी आपले नागरी कर्तव्य म्हणून घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरणे आवश्यक आहे.
सध्या प्रशासनातर्फे थकबाकीदारांसाठी घरपट्टीवरील व्याजाच्या शास्तीवर ७० टक्के सवलत देणारी अभय योजना राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली थकबाकी तातडीने भरावी, असे आवाहनही आयुक्तांनी केले.
याकामी शहरातील धर्मगुरूंनी आपल्या परिसरात घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याबाबत जनजागृती करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. फईम या बैठकीस जमात-ए-इस्लाम हिंदतर्फे अजिम फलाई, शाहिद रमजान, जमीयत उल उलमातर्फे अनिस अहमद, डॉ. एकलाख अहमद, रहमान फाउंडेशनतर्फे जुबैर अहमद आदींसह शहरातील विविध धर्मगुरूंसह उपायुक्त हेमलता डगळे, सहायक आयुक्त मोहंमद तौसीफ शेख, दिनेश मोरे, गृहकर अधीक्षक सचिन भामरे, प्रभाग अधिकारी इरफान मोहंमद अश्रफ व संतोष गायकवाड, उद्यान अधीक्षक निलेश पाटील, प्रमुख स्वच्छता निरीक्षक एकबाल जान मोहंमद, वरिष्ठ लिपिक प्रवीण पवार, अजय वाघ आदी उपस्थित होते
मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासन आगामी काळात सक्त भूमिका घेणार आहे. जप्ती पथक नियुक्त करण्यात आले आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीबरोबरच नळजोडण्या खंडित करण्यात येतील. अनधिकृत नळजोडणीधारकांनी दंड रक्कम भरून नळजोडण्या कायम करून घ्याव्यात.
-सचिन भामरे, गृहकर अधीक्षक