

मालेगाव : प्रमोद सावंत
महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील पूर्व भागात इस्लामचा झंझावात दिसला. या पक्षाला ३५ जागा मिळाल्या. त्यांची आघाडी असलेल्या मालेगाव सेक्युलर फ्रंटमधील मित्र पक्ष समाजवादी पार्टीला पाच जागा मिळाल्याने त्याच्या एकत्रित ४० जागा झाल्या. महापालिकेत एकूण ८४ नगरसेवक आहेत. बहुमताचा जादूई आकडा ४३ असल्याने या फ्रंटला तीन जागा कमी आहेत. त्यामुळेच महापौरपदाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. युती, आघाडीच्या समीकरणाचे पत्ते महापौरपदाच्या आरक्षणानंतरच खुले होणार असले, तरी महापौरपदासाठी जुन्या समीकरणांची उजळणी होणार की, आणखी एक नवीन प्रयोग होऊन तो राज्यात चर्चेचा ठरणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. शहरात व प्रामुख्याने तत्कालीन नगरपालिका, महापालिकेच्या राजकारणात माजी आमदार रशीद शेख यांच्या कुटुंबीयांचा दरारा पुन्हा सिद्ध झाला आहे. रशीद शेख यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली होती. रशीद शेख हयात असतानाच त्यांचे काही जुने जाणते कार्यकर्ते, त्यांचे पुत्र माजी आमदार आसिफ शेख यांच्यापासून दुरावले होते. मात्र, वडिलांच्या निधनानंतर समंजसपणा दाखवित व सारे राजकीय कसब पणाला लावून आसिफ शेख यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा संच तयार केला. सावत्र आई माजी महापौर ताहेरा शेख, भाऊ इमरान शेख व आपसात असलेली कटुताही संपुष्टात आणली. संपूर्ण कुणबा एक झाल्याने कार्यकर्त्यांना हुरूप आला. पदाधिकारी व कार्यकर्तेही एकदिलाने आसिफ शेख यांच्या पाठीशी उभे राहिले. आई ताहेरा शेख यांनी त्यांचे नेतृत्व केव्हाच मान्य केले होते. त्यामुळे 'इस्लाम'च्या झंझावातापुढे एमआयएम व महाविकास आघाडी पुरती भूईसपाट झाली. 'इस्लाम 'समवेत युती केल्यानेच समाजवादी पार्टीला पाच जागा मिळविता आल्या. हा पक्ष स्वतंत्र लढला असता, तर त्याचीही स्थिती काँग्रेससारखीच तीन तिघे अशीच झाली असती. पूर्वेकडे माजी आमदार आसिफ शेख यांचा झंझावात असताना पश्चिमेकडे मंत्री दादा भुसे यांचे वादळ होते. या वादळात भाजपची नौका सर्व नेते एकत्र येऊनदेखील पुरती बुडाली. २० पैकी अवघ्या दोन जागा भाजपला राखता आल्या. यातही प्रमोद बच्छाव यांची एक जागा म्हणजे सोयगाव येथील बच्छाव इस्लाम कुटुंबीयांचा समाजवादी पार्टी एकोपा, शिवसेना बंडूकाका बच्छाव यांचा हातभार व स्वतः उमेदवार प्रमोद बच्छाव यांचा एकहाती करिश्मा यामुळे आलेली आहे. शिवसेनेने १८ जागा मिळवून सर्वांच्याच भुवया उंचाविण्यास भाग पाडले. या दोन पक्षांना दणदणीत विजय मिळाला असला, तरी एकंदर स्थिती पाहता महापौरपदाचे काय? हे कोडे शहरवासीयांसह राजकीय जाणकार व तज्ज्ञांना पडले आहे. या पार्श्वभूमीवर प्रारंभी बहुमतासाठी तीन जागा आवश्यक असल्यामुळे नेमक्या तेवढ्याच जागांवर विजय मिळविलेल्या काँग्रेसचे एजाज वेग यांना समवेत घेऊन सत्ता स्थापन करणे 'इस्लाम'ला सोयीचे आहे. तथापि, आसिफ शेख व एजाज वेग यांच्यात फारसे सख्य नाही. अशातच महापालिका निवडणुकीपूर्वीच 'इस्लाम'चा मित्रपक्ष असलेल्या समाजवादीचे समर्थक व काँग्रेसचे वेग यांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी झाली. हे प्रकरण जिवे ठार मारण्यापर्यंत पोहोचले होते. ही कटुतादेखील नव्या समीकरणात काहीसा अडथळा ठरू शकते. ही बाब हेरूनच समाजवादी पार्टीचे मुस्तकीम डिग्रिटी यांनी, थेट सेक्युलर पार्टी कोणीही आमच्या समवेत आल्यास त्यांचा पाठिंबा घेऊ, असे भाष्य करीत एमआयएमला अप्रत्यक्षरीत्या आवतण दिले. हे होण्याची शक्यता कमी असली, तरी राज्यात नवनवे हातखंडे व वेगळे प्रयोग राबविण्यात मालेगाव आघाडीवर आहे. या इस्लाम स्थितीत पूर्व समाजवादी पार्टी भागातील काँग्रेस 'इस्लाम' व एमआयएम हे दोन कट्टर विरोधक एकत्र येऊ शकतात यात फारसे नवल नाही. कारण यापूर्वी २००७मध्ये एकमेकांविरोधात लढलेले आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांचे समर्थक नजमुद्दिन शेख गुलशेर हे महापौर व तत्कालीन रशीद शेख यांचे समर्थक सखाराम घोडके हे उपमहापौर झाले होते. थेट दोन टोके एकत्र आणण्याचा करिश्मा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि बाबा सिद्दिकी यांनी केला होता. त्यामुळेच राज्यात गमतीने 'यह मालेगाव है भाई, यहा कुछभी होता हैं' म्हटले जाते. हा आगळा वेगळा प्रयोग न झाल्यास 'इस्लाम'ला शिवसेनेशिवाय महापालिकेच्या गत पाच वर्षांत पर्याय नसेल. पूर्वाश्रमीचे काँग्रेस म्हणजेच आताची 'इस्लाम' यांनी शिवसेनेनेबरोबरच सत्ता उपभोगली. अखेरचे सहा महिन्यात अंदाजपत्रकावरून झालेली घूसफूस वगळता, साडेचार वर्षे त्यांच्यात सलोखा होता. पाठिंब्याच्या बदल्यात शिवसेनेचे सखाराम घोडके, नीलेश आहेर यांना उपमहापौरपद देण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर जयप्रकाश उर्फ जेपी बच्छाव व राजाराम जाधव या शिवसेना नगरसेवकांना स्थायी समिती सभापतीपदाचीही संधी मिळाली होती. मात्र, त्यावेळी युतीसाठी रशीद शेख यांचा समंजस व जाणतेपणा तसेच मंत्री दादा भुसे यांच्याशी असलेले त्यांचे सख्यही कारणीभूत होते. हा शेख व भुसे कुटुंबीयांचा सलोखा कायम असला, तरी रशीद शेख यांच्या निधनानंतर त्यात थोडासा दुरावा आला आहे. नजीकच्या काळात माजी आमदार आसिफ शेख यांनी मंत्री दादा भुसे यांच्याशीही जुळवून घेतले होते
विकास हवा की, मध्य-बाह्य वाद?
महापालिकेत आजवरची परंपरा पाहता, मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतदारसंघांत विखुरल्या गेलेल्या नेते, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांनी हातात हात घालून काम केल्यास शहराचा विकास हाऊ शकतो. गत पाच वर्षांत मंत्री दादा भुसे यांनी भरभरून निधी आणल्यामुळे मालेगाव बाह्यचे रूपच पालटले. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मध्य-बाह्यसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. भुसे यांनी आणलेल्या रस्ते विकास निधीतून मध्य, बाह्य या दोन्ही भागांसाठी उपयोगी ठरणारे द्याने, मोसम पूल व सांडवा पूल असे चार नवीन पूल मोसम नदीपात्रावर साकारले आहेत. मध्यमधील द्याने, रमजानपुरा, दरेगाव, सायने असा काही संमिश्र लोकवस्तीचा भाग मंत्री भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदार संघातदेखील आहे. मंत्री भुसे यांचे राज्य मंत्रिमंडळातील स्थान, नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले नगरविकास खाते गत पाच वर्षांतील युती, त्या काळात झालेली विकासकामे या बाबी पाहता 'इस्लाम' व शिवसेना नगरसेवकांसाठी विकासकामांसाठी याच पद्धतीने सत्तेचा सोपान सर व्हावा. मध्य-बाह्य कटुता दूर व्हावी, असे वाटते. दुसरीकडे कट्टरपंथी असलेल्यांना पूर्व भागातील दोन टोकांचे विरोधक एकत्र आले, तरी चालतील, असे वाटते. एकूणच या त्रिशंकू स्थितीत काय होणार याची व महापौरपदाचे आरक्षण काय निघणार याचीच उत्सुकता आहे.