

मालेगाव : कोणतीही करवाढ नसलेला, तरीही महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन 2025-2026 च्या 1,055.02 कोटींच्या अंदाजपत्रकास गुरुवारी (दि. 27) महापालिका आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी मंजुरी दिली.
नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून, त्यादृष्टीने अंदाजपत्रकाची मांडणी करण्यात आल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले. अंदाजपत्रकीय विशेष सभा मनपा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त गणेश शिंदे, हेमलता डगळे, पल्लवी शिरसाठ, वित्त व मुख्य लेखाधिकारी गजानन पाटील, लेखाधिकारी हरिश डिंबर, नगरसचिव अनिल सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील पायाभूत सोयी सुविधांवर भर देण्यात आला असून, यामुळे शहरातील रस्ते, रुग्णालय, मलनिस्सारण, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता केली जाणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून, सर्वेक्षणानुसार 2025-26 मध्ये गृहकरापासून 50 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न अपेक्षित धरून विकासकामांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत मंजूर अमृत मलनिस्सारण प्रकल्प 2 अंतर्गत 2025-26 मध्ये 100 कोटींपेक्षा अधिक अनुदान प्राप्त होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मनपा हिश्श्याच्या अपेक्षित खर्चाचर विचार करून चालू अंदाजपत्रकात 75 कोटींची तरतूद केली असली, तरी शासनाकडून उपलब्ध होणार्या निधीच्या प्रमाणात मनपा हिस्सा उपलब्ध करून दिला जाणार आहे. आगामी आर्थिक वर्षात पाच ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून उत्पादित विजेचा वापर मनपाचे पथदीप, जलशुद्धीकरण केंद्र व आवश्यक असलेल्या ठिकाणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यांनतरही शिल्लक वीज महावितरण कंपनीस विक्री करून त्याद्वारे उत्पन्नात वाढ होणार आहे. या प्रकरणी शासनाकडून अनुदान प्राप्त करून घेणार आहे. शहरात अनेक ठिकाणी सोडियम पथदीप लावलेले आहेत. या दिव्यांना जास्त प्रमाणात वीज खर्च होते. त्या अनुषंगाने सोडियम पथदीप बदलून त्याऐवजी कमी विजेचा वापर होणारे एलईडी दिवे संपूर्ण मनपा क्षेत्रात येत्या दोन महिन्यांत लावले जाणार असून यासाठी पाच कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष सभेस सहायक आयुक्त अनिल पारखे, लेखापरीक्षक शेखर वैद्य, शहर अभियंता कैलास बच्छाव, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, उपअभियंता सचिन माळवाळ आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरवर्षी पाच टक्के पाणीपट्टीवाढ करण्यात येते मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे पाणीपट्टीवाढ रद्द करावी यासाठी शासनाकडे ठराव पाठविण्यात आला आहे. त्यास अधिन राहून यावर्षी पाणीपट्टीवाढ करण्यात आलेली नाही. शहरात 1.30 लाख मालमत्ता आहेत. त्यापैकी 60 ते 65 हजार मालमत्ताधारकांनी नळ कनेक्शन घेतलेले नाही. त्यामुळे रहिवासी 1 हजार 500, तर बिगररहिवासी 2 हजार 500 रुपये पाणीपट्टी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे अंदाजपत्रक 1,055.02 कोटी रुपयांचे असून, यामध्ये अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक रुपये 97.02, महसुली जमा 475.03, भांडवली जमा 199.18, भाग तीन जमा 56.06, तर अंदाजपत्रकामध्ये महसुली जमा 59.04 कोटी, भांडवली जमा 168.69 कोटी असे मिळून एकूण 1,055.02 कोटी जमा बाजूस आहेत. खर्च बाजूमध्ये अंदाजपत्रकामध्ये महसुली खर्च 342.45 कोटी, भांडवली खर्च 358.63 कोटी, भाग तीन खर्च 36.48 कोटी, अखेरची शिल्लक 26 लाख, तर अंदाजपत्रकात महसुली खर्च 30.51 कोटी, भांडवली खर्च 286.69 कोटी असे एकूण 1,055.02 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे.