

मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत ८४ पैकी ३५ जागांवर दणदणीत विजय मिळवत माजी आमदार आसिफ शेख यांचा इस्लाम पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. समाजवादी पार्टीला ५ जागा मिळाल्याने इस्लाम व समाजवादी पार्टीच्या मालेगाव सेक्युलर फ्रंट या आघाडीला सत्तेचे सोपान सुलभ झाले आहे.
हा फ्रंट सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचला असला तरी त्यांना बहुमतासाठी ३ जागांची गरज भासणार असल्याने पाठिंबा कोणाचा याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील पश्चिम भागात २० पैकी १८ जागांवर निर्विवाद विजय मिळवत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा आपला करिष्मा सिद्ध केला आहे. मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांचा पुरता भ्रमनिरास झाला. त्यांच्या एमआयएमला अवघ्या २१ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
काँग्रेसचे एजाज बेग अवघ्या ३ जागा मिळवूनही किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. भाजपचा सुपडा साफ झाला. भाजपला अवघ्या दोन जागा राखता आल्या. भाजप नेते बंडूकाका बच्छाव आपल्या होमपीचवर सोयगावमध्ये प्रवीण ऊर्फ प्रमोद बच्छाव यांना विजयी करण्यात यशस्वी ठरले. भाजप नेते सुनील गायकवाड यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. येथील आयएमए सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना, राज्य वखार महामंडळ गोदाम व कृष्णा लॉन्स या चार वेगवेगळ्या केंद्रांवर सकाळी १० ला १२ टेबलांवर मतमोजणीला सुरुवात झाली. तत्पूर्वी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना ओळखपत्र पाहून केंद्रात सोडण्यात आले.
फेरीनिहाय मतमोजणीत कल स्पष्ट झाल्यानंतर पूर्व भागातील एमआयएम व पश्चिम भागात भाजप नेते, कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. इस्लामचे विजयी उमेदवार माजी आमदार आसिफ शेख यांच्या, तर शिवसेना उमेदवार शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात भेटीसाठी जात होते. दुपारनंतर मंत्री भुसे नाशिकला रवाना झाले. यानंतर युवा नेते आविष्कार भुसे विजयी मिरवणुकांमध्ये सहभागी होत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होते. शहरातील रस्त्यांवर गुलाल व हिरव्या रंगाच्या गुलालाचा खच पडलेला होता. विजयी मिरवणुकांना प्रतिबंध असूनही सायंकाळपर्यंत सगळीकडे जल्लोषात मिरवणुका सुरू होत्या.