

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
कुसुं बामार्गे मालेगावकडे येणाऱ्या कंटेनरने नवीन बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली रस्ता ओलांडणाऱ्या ७५ वर्षीय महिलेला धडक दिली. त्यानंतर कंटेनरच्या पुढील चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. निर्मला शांताराम जाधव, रा. टिंगरी, ता. मालेगाव असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी उड्डाणपुलाखाली ठिय्या आंदोलन करीत अवजड वाहतूक कायमची वळविण्याची मागणी केली.
निर्मला जाधव या टिंगरीहून बसने मालेगावात आल्या होत्या. येथून त्या मुंगसे येथे मुलीकडे जाण्यासाठी निघाल्या असताना हा अपघात झाला. विशेष म्हणजे, शनिवारी याच मार्गावर लेंडाणे येथील ११ वर्षीय आरोही चव्हाण हिचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. अवघ्या २४ तासांत दोन अपघातांत दोघांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.
नवीन बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखालील अवैध पार्किंग आणि अतिक्रमण हा वाहतूक व्यवस्थेसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. या ठिकाणी वाहनांची अनियंत्रित पार्किंग, व्यावसायिक अतिक्रमाणे आणि वाढती वाहनसंख्या यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीचा खोळंबा नित्याचा झाला आहे. याबाबत नागरिकांकडून वेळोवेळी प्रशासनाला अवगत करण्यात आले असतानाही तात्पुरती कारवाई झाल्यानंतर काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
त्यातच मालेगाव-कुसुंबा मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाढती वाहतूक धोकादायक ठरत आहे. परिसरात शाळा असून, विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. वाढती वाहनसंख्या, अवजड वाहनांची ये-जा, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडी यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाची अशी दुरावस्था होत असल्याने प्रशासनाच्या वाहतूक नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपघातानंतर नागरिकांनी उड्डाणपुलाखाली ठिय्या आंदोलन केले. अवैध पार्किंग व अतिक्रमण हटवावे, वाहतूक नियोजन करावे आणि मालेगाव-कुसुंबा मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक कायमस्वरूपी पर्यायी मार्गाने वळवावी, अशा मागण्या करण्यात आल्या. लोकप्रतिनिधी, महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
अपर पोलिस अधीक्षकांनी डोंगराळे तसेच शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती वळवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, पुढील दोन-तीन दिवसांत कायमस्वरूपी निर्णय न झाल्यास मालेगाव-कुसुंबा मार्गावर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शफिक अँटीकरप्शन यांनी दिला.
निर्मला जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरा टिंगरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मालेगाव-कुसुंबा मार्ग हा शहराच्या वाढत्या विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असताना अवैध पार्किंग, अतिक्रमण, अवजड वाहनांची वाहतूक आणि वाहतूक कोंडीमुळे या परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. जवळच्या शाळांमुळे विद्यार्थ्यांची वर्दळ, वाढती वाहनसंख्या आणि अरुंद होत जाणारा रस्ता यांचा मेळ घातक ठरत आहे. त्यामुळे केवळ अपघातांनंतरची तात्पुरती कारवाई न करता या मार्गासाठी कायमस्वरूपी वाहतूक आराखडा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
"अवजड वाहतुकीमुळे मालेगाव-कुसुंबा मार्ग अपघातांचे केंद्र बनला आहे. निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अवजड वाहतूक कायमची हटवून पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. आम्हाला केवळ आश्वासन नको, ठोस निर्णय हवा."
- राजेंद्र जाधव, माजी सभापती,