

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील चिखलओहोळ येथे सुरू असलेल्या रिलायन्स कंपनीच्या बायोगॅस प्रकल्पातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचे जीवन असह्य झाले असून, गावातील सुमारे सहा हजार नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. 'टाकाऊतून टिकाऊ ऊर्जा' या संकल्पनेतून उभारण्यात आलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात गावकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रकल्पापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या धोंडीराम वस्तीतील ३० ते ३५ कुटुंबांना या दुर्गंधीचा सर्वाधिक फटका बसत आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी वासाची तीव्रता वाढत असून, घरात बसणेही कठीण होते, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. या दुर्गंधीमुळे डोकेदुखी, मळमळ, उलट्या तसेच वसनाचे त्रास वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या मते, बायोगॅसनिर्मितीनंतर उरलेली मळी उघड्यावर राहिल्यास त्यांतून मिथेन, हायड्रोजन सल्फाईडसारख्या घातक बायूंचे उत्सर्जन होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, स्थानिक पर्यावरणावरही दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी ग्रामसभेची संमती घेण्यात आली का तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 'कन्सेंट टू ऑपरेट' नियमांचे पालन झाले आहे का, याबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परिसरातील हवेची स्वतंत्र तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रकल्पापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. येथे दररोज शिकणाऱ्या ७०० ते ८०० विद्याध्यर्थ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. दुर्गंधीमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, जेवणाची इच्छा होत नाही तसेच रात्री झोप लागत नसल्याची भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कंपनीचे स्पष्टीकरण प्रकल्प
व्यवस्थापक विशाल गवले यांनी दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. मळीवर औषध फवारणी, कच्चा माल त्वरित प्रक्रियेत टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आदी उपाययोजना सुरू आहेत, समस्या कायम राहिल्यास तोडगा काढला जाईल, असे सांगितले.
प्रत्येक ग्रामस्थाचा ३ कोटींचा विमा उतरवा
प्रकल्प सुरक्षित असल्याचा दावा कंपनी करीत असल्यास ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारून प्रत्येकाचा किमान तीन कोटी रुपयांचा आरोग्य व टर्म विमा उतरवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुढे येत आहे.
प्रकल्पामुळे प्रगती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता दुर्गंधीमुळे जगणे कठीण झाले आहे. आमच्या कुटुंबीयांना श्वसनाचे त्रास वाढत आहेत. शुद्ध हवेसाठी आम्हाला आंदोलन करावे लागले, तरी मागे हटणार नाही.
रवींद्र मोरे, ग्रामस्थ, चिखलओहोळ
कंपनीकडून प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या या प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे लहान मुले, महिला व वृद्धांना श्वसनाचा त्रास, डोकेदुखी व उलट्या यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत.
प्रसाद अहिरराव, सामाजिक कार्यकर्ते