

चांदवड : यंदा संक्रांत एकादशी तिथीला आल्याने अनेक भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, संक्रांतीच्या दिवशी एकादशी असली तरी एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्तींना तिळगुळ खाण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ पुरोहित व ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक अरुण दीक्षित यांनी व्यक्त केले आहे.
देवांना उपवास नसतो, त्यामुळे संक्रांतीचा नेवैद्य नेहमीप्रमाणे देवाला अर्पण करावा. एकादशीचा उपवास असलेल्या व्यक्तीने नेवैद्य देवाला दाखवून त्याचा केवळ वास घेतला तरी प्रसाद घेतल्याचे पुण्य मिळते. यामुळे उपवास भंग होत नाही आणि सणही श्रद्धेने साजरा होतो, असे त्यांनी सांगितले.
संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध असल्यास तेही करता येते. श्राद्धाचे पिंड हे भाताचेच असावेत तसेच श्राद्धासाठी भोजन करणारी व्यक्ती एकादशीचा उपवास नसलेली असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विवाहानंतर प्रथमच येणारी संक्रांत असली तरी ती आपल्या परंपरेप्रमाणे साजरी करावी. सुवासिनी महिलांनी दरवर्षीप्रमाणे वाणदान करावे. तसेच लहान बालकांचे बोरन्हाण, काळी वस्त्रे, हलव्याचे दागिने, सत्यनारायण पूजन आदी सर्व वार्षिक धार्मिक विधी नेहमीप्रमाणे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
दरवर्षी संक्रांत अशुभ आहे अशा अफवा पसरवल्या जातात; मात्र अशा गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही श्री. दीक्षित यांनी यावेळी केले.