

लासलगाव (नाशिक) : नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात मक्याची आवक होत आहे. साधारणपणे ८ ते ९ हजार क्विंटल दररोज एकट्या लासलगाव बाजार समितीत मक्याची आवक होत असल्याने हा मका इतरत्र पाठविला जात आहे. या हंगामातील पहिल्यांदा पंजाबच्या दिशेने जवळपास २,६०० टन मका रेल्वेद्वारे रवाना झाला. रेल्वेद्वारे मका जाणार असल्यामुळे वेळेची तसेच वाहतूक दरात बचत होणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात मका पिकाचे बंपर उत्पादन झाले आहे. जवळपास सात महिने पाऊस सुरू असल्याने इतर शेतीपिकांना फाटा देत शेतकऱ्यांनी मका पीक उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सध्या सर्वच बाजार समित्यांत मक्याची मोठी आवक होत आहे. मक्याला प्रतिक्विंटल १.५०० ते १.६०० रुपये भाव मिळत आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगावला सध्या मक्याच्या विक्रीमधून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. चालू हंगामात पहिल्यांदाच रेल्वेद्वारे पंजाबमधील पगवाडा येथे २,६८५ टन मका ४२ रेल्वे डब्यांच्या माध्यमातून पाच दिवसांत १,६०० किलोमीटरचा प्रवास करत पोहोचवला जाणार आहे. या हंगामात जास्त आवक झाल्यामुळे पहिलाच रॅक पंजाबच्या दिशेने रवाना झाला आहे. आणखी आवक वाढल्यास आणखी रेल्वेद्वारे इतरत्र मका पाठवणार असल्याची माहिती मका खरेदीदारांनी दिली आहे. रेल्वेद्वारे मका पाठविला जात असल्यामुळे जवळपास १३० मालट्रकचालकांना, तर ३५० हून अधिक कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. यानिमित्त रेल्वेला चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे