

नाशिक : नाशिकमध्ये सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवामध्ये आयोजित महारोजगार मेळाव्यात युवक, युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 1600 जणांनी नावनोंदणी केली त्यापैकी 363 जणांची नोकरी निश्चित झाल्याचे पत्र संबंधित संस्थांकडून देण्यात आले, तर 700 उमेदवारांना टप्प्याटप्प्याने मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. यानिमित्त शनिवार (दि.8) सायंकाळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी स्वतः उपस्थित राहून मेळाव्यात सहभागी तरुणांना आशीर्वाद दिले.
महारोजगार मेळाव्यात सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ विभागीय संचालक डॉ. दिगंबर मोकाट, कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. पराग हळदणकर, भूषण निकम, नाशिक येथील आत्मा विभागाचे अधिकारी अभिमन्यू काशीद, विलास सोनवणे आदी मान्यवरांनी तरुणांना मार्गदर्शन केले. शेतीशी निगडित व्यवसायांमध्ये आणि शेतीमध्ये भविष्यात कशा संधी उपलब्ध आहेत याबाबत सखोल मार्गदर्शन यावेळी केले. नोकरीच्या शोधात न फिरता तरुणांनी स्वतःच्या व्यवसायाचा विचार करावा असे आवाहनही मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक आबासाहेब मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.