

चांदवड : चांदवड व देवळा तालुक्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळावा यासाठी मंगळवारी (दि.१) येथील रेणुका मंगलकार्यालयात सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केदा नाना मित्र परिवाराने केले आहे. (Maharojgar Mela has been organized at Chandwad and Deola)
नाफेडचे संचालक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. दिव्यांग तरुण-तरुणींना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. निवड झालेल्या तरुणांना तत्काळ नियुक्तिपत्र दिले जाणार आहे. दहावी ते पदवीधर तरुण तरुणींना संधी दिली जाणार आहे.
चांदवड व देवळा तालुके हे दुष्काळी आहेत. या ठिकाणी पाण्याअभावी औद्योगिक क्षेत्राचा अभाव असल्याने स्थानिक तरुण- तरुणींना तत्काळ रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेरोजगार तरुण- तरुणींना एक संधी मिळावी यासाठी केदा आहेर यांनी राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनी चालकांशी संवाद साधून चांदवडला हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे.