

नाशिक : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर आणि महापालिकांपूर्वी या निवडणुका होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर ग्रामीण भागात इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफूट आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे बदललेली आहेत. शहरात भाजपकडे इच्छुकांचा ओढा असला, तरी ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे शिवसेनेकडे अधिक कल दिसून येत आहे. गट-गण आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक आपले पत्ते खोलतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झाली आहे. नव्या प्रारूप गट-गण रचनेनुसार जिल्हा परिषद गटांची संख्या 73 वरून 74 झाली असून मालेगाव, चांदवड व सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला आहे.
निफाड तालुक्यातील दोन गट संपुष्टात आल्याने तिथे फेररचना झाली आहे. निवडणूक शाखेकडून तयारी सुरू असताना इच्छुकांनीही हालचाली गतिमान केल्या आहेत. गट-गण रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण जाहीर होणार असले तरी, काहींनी आधीच संभाव्य आरक्षणावर अंदाज बांधत चाचपणी सुरू केली आहे.
चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात बंडखोरी केलेले त्यांचेच बंधू केदा आहेर, भाजपचे गटनेते राहिलेले डॉ. आत्माराम कुंभार्डे यांची भाजपतून हकालपट्टी केलेली आहे. केदा आहेर व डॉ. कुंभार्डे यांनी मात्र अद्यापही कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. दोघांनीही अधिकृत भूमिका मांडलेली नसल्याने त्यांच्या भूमिककडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेकडून अध्यक्षपदाची संधी मिळालेले उदय सांगळे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सिन्नरमधून उमेदवारी केली.
शिवसेनेने संधी दिलेले दुसरे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार अनिल कदम यांच्या विरोधात उघड उघड भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आमदार दिलीप बनकर यांना साथ दिली. मात्र त्यांनी अद्यापही कोणत्या पक्षात प्रवेश केलेला नाही.
आमदार किशोर दराडे यांनी ठाकरे यांची शिवसेना सोडत, शिंदे सेनेत प्रवेश केला असून, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत जिंकली. त्यांचेच बंधू विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. मात्र त्यांच्या पत्नी सुरेखा दराडे व त्यांचे पुत्र जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांनी अद्यापही शिवसेना सोडलेली नाही व आपली भूमिका ही स्पष्ट केलेली नाही.
येवल्यातून राष्ट्रवादीकडून संधी मिळालेले सभापती संजय बनकर यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांचे वडील अंबादास बनकर हे अजित पवारांच्या गटात आहे.
माजी सभापती यतिंद्र पगार हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून निवडून आलेल्या सीमंतिनी कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे.
काँग्रेसकडून निवडून आलेल्या माजी सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेत निवडून आलेले भास्कर भगरे यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करत दिल्ली गाठली.
जिल्ह्यात शहरी भागात भाजपचा प्रभाव असला तरी, ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले असून, त्याच्या मोबदल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यास नरहरी झिरवाळ, अॅड. माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ असे तीन तीन मंत्री दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची सात मतदारसंघांत मजबूत पकड असून, पक्षाने या नेत्यांना इतर मतदारसंघांची जबाबदारीही दिली आहे. त्यातून इच्छुकांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे वर्चस्व लक्षात घेता अनेक इच्छुक पक्षप्रवेशासाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे, शिंदे गटाकडेही अनेक इच्छुकांचा कल आहे.
एकूण : 73
शिवसेना : 26
राष्ट्रवादी काँग्रेस : 18
भाजप : 16
काँग्रेस : 8
माकप : 3
अपक्ष : 2
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : 13
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 9
उबाठा शिवसेना : 10
एकनाथ शिंदे शिवसेना : 11
भाजप : 13
काँग्रेस : 3
माकप : 2
अद्यापही भूमिका अस्पष्ट : 7
भाजपातील पाच सदस्य अव्दय हिरे समर्थक आहेत, हिरे आता उबाठा शिवसेनेत आहे. त्यामुळे या सदस्यांनीही भूमिका मांडलेली नाही.