

नाशिक : प्रक्षिणार्थी पोलिस उपनिरीक्षकांसाठी दीक्षांत संचलन समारंभ आयुष्यातील महत्वाचा व अविस्मरणीय असतो. घेतलेल्या शपथेव्दारे जी जबाबदारी स्वीकारली आहे, ती महत्वाची असून त्याचे सर्वजण गांभीर्यपूर्वक पालन करतील, असा आशावाद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्र. १२६ मधील ३२२ पुरुष व ६७ महिला असे ३८९ प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षणानंतर त्यांचा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि.24) रोजी महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षणार्थीकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. यावेळी अकादमीचे सहसंचालक अरविंद साळवे यांनी प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते. जगमलानी म्हणाले की, दिवसेंदिवस तंत्रज्ञान जसजसे विकसीत होत आहे त्याप्रमाणात सायबर व आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा गुन्ह्यांना हाताळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे ठरते. त्यासाठी कालसुसंगत ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्या अंमली पदार्थांचा होणारा मोह ही पोलिसांसमोरील महत्वाची आव्हाने आहेत. याबाबत जनजागृती व कठोर कारवाई करावी.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, नक्षलग्रस्त भागातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय आहे. गुन्हे प्रतिबंध, गुन्हे अन्वेषण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात जनतेचा सहभाग आवश्यक असतो. जनता व पोलिसेहत सुसंवाद राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यरत राहणे महत्वाचे आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. जनताभिमुख काम करताना पोलिसांनी प्रलोभनांना बळी न पडता पारदर्शक कारभार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित कुटुंबियांचे अभिनंदन करत या अधिकाऱ्यांना नवीन भूमिकेत काम करताना कुटुंबाच्या पाठिब्यांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दीक्षांत संचालनात सहभागी ३८९ निशस्त्र उपनिरीक्षक कोठेही कमी पडणार नाहीत, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थीचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
यांचा झाला सन्मान
सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्वर सन्मान या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने प्रियांका शामला शांताराम पाटील या प्रशिक्षणार्थीस सन्मानित करण्यात आले. यासह बेस्ट ट्रेनी सर्वोकृष्ट महिला प्रशिक्षणार्थी, सर्वोकृष्ट कायदा व अभ्यासक्रम पुरस्कार मिळाला. दीपक घोगरे यास द्वितीय सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्वोकृष्ट कवायत पुरस्कार वैभव डोंगरे, प्रियांका पाटील, सर्वोकृष्ट गोळीबार पवन गोसावी, सर्वोकृष्ट बाह्यवर्ग दीपक घोगरे यांना सन्मानित करण्यात आले. समारंभासाठी उपसंचालक संजय बारकुंड, उपसंचालक अनिता पाटील, उपसंचालक प्रशांत खैरे, उपसंचालक गीता चव्हाण, उपसंचालक पद्मजा चव्हाण यांच्यासह अकादमीतील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सीमा पेठकर व गीताराम गायकवाड यांनी केले.
६ किमी पायपीट ते परेड कमांडर
महाराष्ट्र पोलीस अकादमीत पार पडलेल्या समारंभात प्रियंका पाटील यांना पाच मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. शिक्षणासाठी रोज ६ किमीची पायपीट करणारी एक सामान्य ग्रामीण मुलगी ते कमांडर प्रवास इतरांना प्रेरणा देणारा आहे. कोल्हापूरच्या चंदगडमधील जगनहट्टी या छोट्या गावातील असलेल्या प्रियंका पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून हे यश मिळवले. वडिलांचे निधनानंतर आलेल्या जबाबदाऱ्यांनाही न डगमगता त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि संघर्षावर मात करत त्यांनी बी. फार्मसी शिक्षण केले. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी तिचे कौतुक केले.
समाजातील सर्व घटकांना पोलिस सेवेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. एक आदर्श पोलिस अधिकारी कसा असतो हे सिद्ध करेन. माझ्या यशामध्ये आई, गुरु, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांचे मार्गदर्शन मिळाल्यानेच हे यश मिळवू शकले.
प्रियंका पाटील, उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी