

नाशिक : अतिवृष्टी व पूरबाधितांच्या मदतीसाठी राज्य शासनाने राज्यातील २५१ तालुके पुर्णत: तर ३१ तालुके अंशत: बाधित घोषित केले आहेत. यंदा पावसाचा तडाखा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बसल्याने संपूर्ण जिल्ह्याच आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १२ तालुके पुर्णत: तर तीन तालुके अंशत: बाधित जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व तालुक्यांमधील आतिवृष्टीग्रस्तांना दुष्काळसदृश परिस्थितीत लागू असलेल्या सवलती मिळणार आहेत.
राज्यात विविध ठिकाणी जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे पिक तसेच शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पशुहानी, मनुष्यहानी झाली असून घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे अनेक गावातील बाधितांना स्थलांतरीत करावे लागले आहे.
जिल्हास्तरीय यंत्रणांमार्फत राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून त्यानुसार जून ते आॉगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेबर २०२५ मध्ये सुमारे ३९ लाख हेक्टर अशाप्रकारे संपूर्ण राज्यात एकूण ६५ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीबाधितांना दुष्काळसदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी राज्यातील २५१ तालुके पूर्णत: व ३१ तालुके अंशत: अशाप्रकारे एकूण २८२ तालुके तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १२ तालुके पुर्णत: तर तीन तालुके अंशत: बाधित घोषित करण्यात आले आहेत. पुर्णत: बाधित तालुक्यांना पुर्ण क्षेत्राकरीता तर, अंशत: बाधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र असतील.
पूर्णत बाधित तालुके: मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला.
अंशत बाधित तालुके : कळवण, देवळा, इगतपुरी.
बाधित तालुक्यांना या सवलती मिळणार -
- जमीन महसुलात सूट; सहकारी कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी) तिमाजी वीज बिलात माफी
- परीक्षा शुल्कात माफी व दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफी.